वाहनातील डिझेल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; बीड ग्रामीण पोलीसांची कामगिरी
बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घातला होता धुमाकूळ
बीड : रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या वाहनातून डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन बीड ग्रामीण पोलीसांनी ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.
खेमचंद तुलसीराम जाटो ( मध्य प्रदेश), सय्यद मुक्तार सय्यद करीम ( अक्कलकोट जि. जालना ), अनिलकुमार बाबुलाल, शोकत मजीद, हाफिज कासमखां, अशोक नजीर चावरे ( सर्व मध्य प्रदेश ), आवेश खां दादे खां ( जालना ) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात बीड जवळील नामलगाव येथील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ५ ट्रक मधून ११०० लिटर डिझेल किंमत १ लाख ३ हजार १५८ रु. चोरी झाल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पेट्रोल पंप व्यवस्थापक सतीश राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पेट्रोल पंप व पाडळसिंगी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज म्हत्वाचे ठरले. ज्या स्कॉर्पिओ मध्ये डिझेलचे कॅंड ठेवले जात होते तीच स्कॉर्पिओ पाडळसिंगी टोलनाक्यावर कॅमेरात कैद झाली. पोलीसांना मार्ग सापडला. गुप्त खबऱ्या कडून मिळालेल्या माहितीनुसार ( दि. १२ ) जालना येथून मुक्तार सय्यद यास ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीसांनी खाक्या दाखवताच सर्व नावं सांगितली त्यावरून ७ जणांची टोळी बीड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतली. या कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.