वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी अंबाजोगाई येथे सीएनजी ( CNG ) पंप सुरू
अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथे सीएनजी ( CNG ) पंप सुरू होणार याची फक्त चर्चा सुरू होती. काम पुर्ण झाल्याने आज-उद्या सुरू होणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आज गुरुवारी ( दि २० ) सायंकाळी हा बहुचर्चित व वाहनधारकांना दिलासा देणारा सीएनजी ( CNG ) पंप सुरू झाला.
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. वाहन वापरावे तर खिशाला भार सोसत नाही अन् नाही वापरावं तर वेळेत कुठेच पोचता येत नाही. अशा दुहेरी संकटात नोकरदार, व्यापारी व इतर वाहनधारक सापडले आहेत. या पेट्रोल व डिझेलला पर्याय असलेला सीएनजी ( CNG ) पंप अंबाजोगाई येथे सुरू व्हायला हवा अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्यानुसार मोरेवाडी परिसरातील एका पेट्रोल पंप चालकाने सीएनजी ( CNG ) पंप सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेंव्हा पासून अंबाजोगाई येथे सीएनजी ( CNG ) पंप सुरू होतोय याची अंबाजोगाई सह केज, धारुर, परळी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती. तसेच मागील काही दिवसांपूर्वी या पंपाचे कामही पुर्ण झाल्यानंतर आज सुरू होणार उद्या सुरु होणार अशी चर्चा होती. पण सुरू होत नसल्याने वाहनधारकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनेकांना हा तेलाचा खर्च काही टक्के कमी करणारा CNG पंप हवा होता. अखेर ही उत्सुकता संपली असून प्रत्येक्षात मोरेवाडी परिसरातील हा CNG पंप सुरू झाला आहे. ही अंबाजोगाई सह धारुर,केज, परळी येथील वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे.