वादळी वाऱ्याचा फटका! पोखरी जवळ वीज कोसळून महिला ठार; आडसमध्ये घरावरील पत्रे उडाले

लोकगर्जना न्यूज
पोखरी ( ता. अंबाजोगाई ) येथील महिला शेतातून परत येताना वीज कोसळून दोन महिला बेशुद्ध पडल्या दोघींना ही स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता एका महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसऱ्या महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच आडस ( ता. केज ) येथेही अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले आहेत.
आडस व अंबाजोगाई परिसरात आज शुक्रवारी ( दि. ८ ) दुपारी ४ च्या सुमारास अचानक आकाशात ढग भरून आले. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट झाला पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, यावेळी ज्वारी काढून पाऊस आल्याने गावाकडे चाललेल्या महिलांवर पोखरी जवळ वीज कोसळली. वीज कोसळताच दोन्ही महिला बेशुद्ध पडल्या घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दोघींना दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून शेख सलीमाबी अजीम ( वय ३८ वर्ष ) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. संजीवनी बाळासाहेब वाघमारे या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आडस येथेही वादळाचा तडाखा बसला असून, जोरदार वादळ असल्याने साठे नगर जवळील ग्रामपंचायतीच्या गाळ्यावरील पत्रे उडाले, यानंतर विजय वाघमारे यांच्यासह काही घरावरील पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. परंतु अचानक ढग येऊन पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला व उष्णतेतून सुटका मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.