वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्रांवर काळाची झडप भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सात विद्यार्थी ठार
वर्धा- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने झडप घातली असून वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात कार मधील सात जण जागीच ठार झाले. ही घटना वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास घडली. यातील सर्व मयत एमबीबीएस चे शिक्षण घेत होते तर आमदार पुत्र असल्याचे सांगितले जात आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
अधिक माहिती अशी की, सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. झायलो कार पहाटे दीड च्या सुमारास या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून गाडी पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला. आतील सातही जण जागीच ठार झाले. सदरील घटना एका ट्रक चालकाचा लक्षात येताच त्याने घटनेची माहिती सावंगी पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बचाव कार्य सुरू केले. रात्रीचा अंधार व गाडीचा झालेला चेंदामेंदा पहाता मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. पहाटे चार वाजेपर्यंत हे काम सुरू होते. निरज चव्हाण (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा आहे. सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आले. हे सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी माध्यमांना दिली.