वन्यप्राण्याने पाडला दोन बोकड,एक शेळीचा फडशा; शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान
लोकगर्जनान्यूज
केज तालुक्यातील आडस येथील एका शेतकऱ्याने शेतात बांधलेल्या दोन बोकड अन् एका शेळीवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला चढवत फडशा पाडला आहे. सदरील घटना सोमवारी ( दि. २६ ) पहाटे घडल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल ४० हजारांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
प्रदीप बालासाहेब लोंढे रा. आडस ( ता. केज ) यांचे गट क्रमांक ९ मध्ये शेत आहे. आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी एक शेळी घेतली असून त्याचे जवळपास १ वर्षाचे दोन बोकड होती. ते शेतातील कुडाच्या घरात बांधलेली होती. वडील बाजूला झोपले होते. पहाटेच्या सुमारास अज्ञात हिंस्र वन्य प्राण्याने या शेळी व बोकडावर हल्ला चढवून फडशा पाडला आहे. झोपेत असलेल्या शेतकऱ्याला एकदा आवाज आला परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी झोपेतून उठल्यावर पाहिले असता दोन्ही बोकड व शेळी मृत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती वन कार्यालय धारुर यांना देण्यात आली असून आडस येथील पशुधन विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन केले. शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.