आपला जिल्हा

वडवणी पाठोपाठ धारुर तालुक्यातही भगरीतून विषबाधेचा प्रकार

एकाच कुटुंबातील दहा जणांवर उपचार सुरू

 

लोकगर्जना न्यूज

रविवारी ( दि. १० ) आषाढी एकादशी असल्याने या दिवशी प्रत्येकजण उपवास ठेवतो. फराळासाठी भगर सेवन केल्याने यातून कवडगाव ( ता. वडवणी ) येथील ७० च्या जवळपास लोकांना विषबाधा झाली. यानंतर धारुर तालुक्यातही एकाच कुटुंबातील १० जणांना भगरमधून विषबाधा झाल्याचे समोर आले. या सर्वांवर धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये बालकांसह वृद्धांचा समावेश आहे.

रविवारी कवडगाव येथे विषबाधेच्या प्रकाराने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. अनेकांना मळमळ, उलटी, चकरा हा त्रास सुरू झाल्याने वडवणी येथील खाजगी सह प्राथमिक आरोग्य केंद्र ही रुग्णांनी फुल झाले. वाढते रुग्ण पहाता घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने कवडगाव येथे धाव घेतली. येथे शाळेमध्ये रुग्णांवर उपचार सुरू केले. रुग्णांचा त्रास कमी झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. ही घटना ताजी असतानाच धारुर तालुक्यात ही विषबाधेचा प्रकार समोर आला. जहागिरमोहा येथील फाटे कुटुंबाने फराळात भगरचे सेवन केले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वच लहान थोरांना मळमळ, उलटी आणि चकरा येण्याचा त्रास सुरू झाला. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी सरळ धारुरचे ग्रामीण रुग्णालय गाठले. येथे दाखल होताच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केले. इंदुबाई फाटे ( वय ६० वर्ष ), बालासाहेब फाटे ( वय २८ वर्षं ),दिगांबर फाटे ( वय ३० वर्ष ), भारती फाटे ( वय ७ वर्ष ), सुनिता फाटे ( वय २५ वर्ष ), अश्विनी ( वय ३० वर्ष ), पुजा फाटे ( वय १३ वर्ष ), लक्ष्मण फाटे ( वय १० वर्ष ), कोमल फाटे ( वय १६ वर्ष ), विजय फाटे या दहा जणांचा समावेश आहे.

अन्न भेसळ विभाग करतो काय?

दिवाळी आली की, खवा, मिठाई बनावट येते. याचे सेवन केल्याने विषबाधा झालेल्या बातम्या येतात. तसेच आषाढी एकादशीला हाच प्रकार उपवास असल्याने प्रत्येकजण फराळासाठी शाबू व भगरचा प्रामुख्याने वापर करतात. यातून विषबाधा झाल्याची प्रत्येक वर्षी एकतरी घटना घडतेच मग या भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचा अन्न भेसळ विभाग आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचारी नेमक करतात काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »