वंडरगर्ल संहिता घोक्षे’ ची बालग्राम अनाथालयास भेट
गेवराई : वंडरगर्ल संहिता’ या नावाने युट्युब वर प्रसिद्ध झालेल्या संहिता घोक्षे या बाल युट्युबरने ‘बालग्राम’ अनाथालयास सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी, ‘वंडरगर्ल संहिता’ ने बालग्रामच्या मुलांना फळांचे वाटप करून त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. बालग्रामच्या परिसरात ती इतकी रमली की, मुलांसोबत तिने परिसरात भटकंती केली आणि खेळही खेळली.
बालग्रामचा परिसर समजून घेतांना तिने संगणक कक्ष, ग्रंथालय, निवास व्यवस्था, भोजनकक्ष आदी सर्व विभागांना भेटी देऊन परिसराचे चित्रिकरणही केले. अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेल्या आपल्या ‘वंडरगर्ल संहिता’ या चॅनेलसाठी आपण ‘बालग्राम’ चा व्हिडिओ करणार असल्याचेही ती यावेळी म्हणाली.
प्रारंभी, बालग्रामचे व्यवस्थापकीय अधिकारी विनोद इनकर यांनी ‘वंडरगर्ल संहिता’ चे स्वागत केले. अवघ्या सात वर्षांच्या संहितासोबत तिचे वडिल ज्येष्ठ नाटककार प्रा. बापू घोक्षे, आई विजया बापू, डॉ. प्रविण शिलेदार आणि दिपक गव्हाणे उपस्थित होते. बालग्राम व्यवस्थापनाकडून सर्वांचे आभारही व्यक्त करण्यात आले.