लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता रद्द! याचं श्रेय कोणाला? केंद्राजा दुजा भाव की, राज्य सरकारचे अपयश?
लोकगर्जना न्यूज
जनतेच्या सोयीचा व आडबाजूला असलेल्या अनेक गावांसाठी विकासाचा महामार्ग ठरणारा लोखंडी सावरगाव ते पाडळसिंगी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मंजुरी होती. ती केंद्र सरकारने रद्द केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच इतरही काही रस्ते रद्द करण्यात आल्याचे समजते, त्यामुळे महाराष्ट्रात केंद्राच्या विचारांचे सरकार नसल्याने दुजा भाव करण्यात येत आहे का? तसेच राज्य सरकारलाही याचा पाठपुरावा करता न आल्याचा परिणाम आहे का?, अनेकवेळा काही कामांचे श्रेय घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील पुढारी आटापिटा करताना दिसतात. हा रस्ता रद्द झालाच असेल तर, याचे श्रेय कोणाला? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पुर्वीचा लातूर ते तीसगाव असा हा राज्य रस्ता क्र. १४४ होता. यानंतर याला अंबाजोगाई-मांजर सुंबा व लातूर रस्ते जुळतात त्या लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी असा करुन या मार्गाला राज्य रस्ता २३२ क्रमांक देण्यात आला. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे केंद्राने सर्वे करून राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मिळाला की, या रस्त्याचे काम सुरू होणार असे सांगितले जात होते. राष्ट्रीय महामार्ग होणार म्हणून राज्यानेही याकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम असा झाला की, हा राज्यमार्ग खड्ड्यात हरवून गेला. वाहने तर सोडा साधी बैलगाडी चालवणं यावर अवघड झाले. हा रस्ता चांगला झाला तर हैदराबाद, लातूर, औरंगाबाद जालना चे ३० कि.मी. अंतर कमी होणार आहे. तसेच आडस, धारुर, चिंचवण, वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी असा हा ८४ कि.मी.चा मार्ग आहे. या मार्गावर असे अनेक गावे आहेत ज्यांचा राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गाचा दूर दूरचा संबंध नाही. हा रस्ता झाला तर या गावांसाठी विकासाचा महामार्ग ठरेल, अनेक व्यवसाय सुरू होतील, शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी साधने उपलब्ध होतील, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. तसेच अंतर कमी होत असल्याने इंधन व वेळ वाचेल हे पहाता हा रस्ता सर्वच बाजूंनी सोयीचा आहे. मात्र याकडे पालकमंत्री, खासदार, आमदार या कोणाचेही लक्ष दिसत नाही, रस्त्याची दुरवस्था पाहिली तर असे म्हणने वावगे ठरणार नाही. या भागातील नागरिक रस्त्याचे काम होणार म्हणून डोळे लावून बसले असताना याची तत्वतः मान्यताच केंद्राकडून रद्द करण्यात आली असल्याची कुजबुज सुरु झाली. यात तथ्य किती हे स्पष्ट कोणीही सांगत नाही. तसेच इतरही राज्यातील होणारे राष्ट्रीय महामार्ग रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. हे सत्य असेल तर, महाराष्ट्रात आपल्या विचारांचे सरकार नाही, म्हणून केंद्राकडून दुजा भाव करण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच यासाठी राज्य सरकारने काही पाठपुरावा केला की, नाही, का ते पाठपुरावा करण्यात कमी पडले? हा प्रश्न असून जर पाठपुरावा करण्यात कमी पडले असेल तर, हे राज्य सरकारचेही अपयश असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा विचार केला तर, काहीही काम झाले तरी ‘ते’ मी केलं म्हणून श्रेय घेण्यासाठी आटापिटा केला जातो. याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील जनतेला नेहमीच येतोय. लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी रस्ता केंद्राने ‘खरंच’ रद्द केला असेल तर याचं श्रेय कोणाला? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग होणार नाही? म्हणल्यावर हा रस्ता होणार की, नाही. यासाठी बीडचे पालकमंत्री, खासदार, केज, माजलगाव, गेवराईचे आमदार यातील कोणी प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो आहे.
केंद्राने हात झटकले; आता राज्य सरकारकडून अपेक्षा
राज्य रस्ता क्र. २३२ ची राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता रद्द करुन केंद्र सरकारने हात झटकले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून या राज्य मार्गाचे काम करण्यात येईल का? याकडे जनतेचे लक्ष लागले असून आता केवळ राज्याकडून या रस्त्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.