लोकांनो सावधान! सोशल मीडियावरून फसवणूकीचे अनेक प्रकार
दुचाकी विक्रीची जाहिरात टाकून घातला आर्थिक गंड्डा
लोकगर्जना न्यूज
बीड : सोशल मीडियावरु विविध शक्कल लढवून भामटे फसवणूक करीत असल्याच्या नवीन घटना उघडकीस येत आहेत. आता वाहनांचे फोटो टाकून अत्यंत कमी किंमतीत विकण्याचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सावधान राहा असे आवाहन करण्यात येत आहे.
स्मार्टफोन आल्यापासून सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. हे ओळखून अनेक व्यवसायीक आपल्या वस्तूंच्या जाहिराती यावर टाकत आहेत.तसेच लोकांना फसवणाऱ्या भामट्यांनी मोर्चा याकडे वळवला आहे. कधी कोणाचा अकाउंट हॅक करुन त्या व्यक्तीच्या नावे पैसे मागणे, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याला आपल्या जाळ्यात ओढून लुबाडणे, अश्लिल चॅटिंग, व्हिडिओ कॉल करुन प्रसारित करण्याची धमकी देत पैसे उकळणे असे प्रकार घडत आहेत. आता नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्री आहे म्हणून जाहिरात टाकून जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. असाच प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. १५ जुलैला फेसबुकवर एका बुलेट विक्रीची जाहिरात पाहून योगेश बप्पा पाटोळे रा. बजरंग नगर या तरुणाने बुलेटच्या जाहिराती सोबत दिलेल्या नंबरवर फोन केला. बोलणं होऊन ४६ हजारांत बुलेटचा सवदा ठरला. कागदपत्रे तयार करण्यासाठी त्या भामट्याने २ हजार मागितले योगेशनेही ते ऑनलाईन टाकले. यानंतर त्याने २२ जुलैला मी शहागड पर्यंत आल्याचे सांगून पैसे जमा करण्यास सांगितले. याने तेव्हा ही ऑनलाईन पद्धतीने रक्कम ट्रान्स्फर केली. परंतु तो काही गाडी घेऊन आला नाही अन् पुन्हा काही प्रतिसादही नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाणे गाठून शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच असाच प्रकार धारुर तालुक्यात ही उघडकीस आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.