लोकप्रतिनिधींच्या बोलण्यात विकासाची तळमळ पण राज्य रस्ता २३२ संबंधी मळमळ?
चार जिल्हे, तीन मतदारसंघ आणि सहा तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट
लोकगर्जनान्यूज
लोखंडी सावरगाव,आडस, धारुर,वडवणी, पिंपळनेर, पाचेगाव,पाडळसिंगी हा राज्य रस्ता क्रमांक २३२ असून हा रस्ता चार जिल्हे, चार मतदार संघ आणि सहा तालुक्यांना जोडणारा जनतेच्या सोयीचा व इंधनाची बचत करणारा रस्ता. परंतु जवळपास मागील २५ वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्यामुळे लातूर-औरंगाबाद व जालण्याचे ३० कि.मी. अंतर कमी होणार आहे. तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हा मार्ग रुग्णांसाठी जिवदान देणारा ठरणार आहे. परंतु खासदार, आमदार विकासाची तळमळ दिसून येते पण या रस्त्यासाठी मळमळ का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्ह्यात अनेक रस्ते नवीन झाले असून याचे श्रेयही प्रत्येकाने घेतलं, केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात काहीच गैर नाही. परंतु आमच्या प्रयत्नांमुळे हा रस्ता झाला म्हणणारे २५ वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असलेला जनतेच्या सोयीचा राज्य रस्ता क्रमांक २३२ अडगळीत पडलेला असून या रस्त्याची जबाबदारी कोण घेणार? हा जनतेचा प्रश्न आहे. राज्य रस्ता २३२ हा लोखंडी सावरगाव,आडस, धारुर, पहाडी पारगाव,चिंचवण, वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव,पाडळसिंगी असा आहे. हा मार्ग केज, माजलगाव, गेवराई या तीन मतदारसंघ आणि अंबाजोगाई,केज, धारुर,वडवणी,बीड, गेवराई या सहा तालुके म्हणजे अर्ध्या जिल्ह्याला जोडणारा आहे. तसेच लातूर,बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना जोडणारा तसेच अंतर कमी करणारा आहे. लातूर, अंबाजोगाई,परळी आदि भागातील वाहने बीड शहराला वळसा घालून औरंगाबाद, जालना येथे जातात. हा २३२ राज्यमार्ग झाला तर बीडचा वळसा वाचणार असून तब्बल ३० कि.मी. अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ व इंधन बचत होऊन वाहन धारकांचा आर्थिक फायदा करणारा हा रस्ता आहे. तसेच या रस्त्यामुळे अंत्यंत अडगळीत असलेली अनेक गावे येतात. त्यामुळे या गावांना दळणवळणाची सोय होईल अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक घडी बसेल परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यासाठी तयार नाही. तसेच अंबाजोगाई, लातूर येथे धारुर, वडवणी, माजलगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गंभीर आजारी रुग्णांना घेऊन जाण्यात येते तर औरंगाबाद येथेही अनेकदा रुग्णांना दवाखान्यात घेऊन जावं लागतं. हा रस्ता झाला तर वेळेत पोचता येईल व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे रुग्णाला जिवदान मिळेल. भौगोलिक, आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक,वेळेची बचत या सर्वच दृष्टीने हा मार्ग जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे हा रस्ता करण्यात यावा अशी मागणी आहे.
*दोन वेळा टेंडर निघाला
हा रस्ता पुर्वी राज्य रस्ता क्रमांक १४४ ने ओळखलं जातं होतं. यानंतर नंबर बदलून २३२ करण्यात आले. यापुर्वी या रस्त्याचे दोन वेळा टेंडर निघालं पण त्याच काय झालं? ते काही उजेडात आले नाही. या बाबतीत लोकप्रतिनिधी, अधिकारी कोणीही स्पष्ट माहिती देत नाही.
*निवडणूक वगळता या रस्त्याचा व लोकप्रतिनिधींचा संबंध नाही म्हणून दुर्लक्ष!
हा रस्ता केज, माजलगाव, गेवराई या तीन मतदारसंघातून जातो येथील आमदार अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई तर खासदार परळी येथे रहातात. तिन्ही आमदार व खासदार यांना या रस्त्याचा संबंध येत नाही. हे सर्वंच शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडली गेली आहेत. हा रस्ता केवळ सामान्य माणसाच्या हिताचा व नियमित प्रवासाचा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
*एका वर्षात खर्च निघेल!
लातूर, अंबाजोगाई या भागातून दररोज औरंगाबाद, जालना येथे जवळपास दोन ते तीन हजार वाहने जात असतील ते वाहने जर या मार्गे गेली अन् प्रत्येक वाहनाचा ॲव्हरेज १० कि.मी. प्रति लिटर मानले तरी दररोज हजारो लिटर इंधन बचत होईल. वर्षाचा हिशोब लावलं तर करोडो रुपये वाचतील एका वर्षात या रस्त्यावर झालेलं खर्च निघेल.
*हा राज्यमार्ग इतकं दुर्लक्षित की, गुगल मॅप वर सापडतं नाही
आज प्रत्येक रस्ता गुगल मॅप वर आहे.लहान शहरात गल्ली बोळातील रस्ते नाव क्रमांक शोधले तर सापडतात. परंतु हा राज्यमार्ग २३२ गुगल मॅप वर सापडणार नाही. यासाठी काही पैसे लागत नाहीत. परंतु लोकप्रतिनिधींची री ओढत सार्वजनिक बांधकाम विभागानेही हा रस्ता दुर्लक्षित केला असून, तो चांगला करण्याचं सोडा साधा गुगल मॅप वर अपडेट केला नाही. पुर्वीचा रा.रस्ता क्रमांक १४४ दिसतो पण तोही चुकीचा मार्ग दाखवतो. चांगला रस्ता होईल तेव्हा होईल निदान गुगल मॅप वर तरी हा रस्ता अपडेट करावा ज्यामुळे नवीन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना फायदा होईल.