लाडेवडगाव जळालेल्या घटनेचा उलगडा… पोलीस तपासात खूनामागील धक्कादायक कारण समोर
लोकगर्जना न्यूज
केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात ( दि. ३ ) एप्रिल एक जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा एएसपी पंकज कुमावत यांनी छडा लावला असून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले. त्यामुळे मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आडस-होळ रस्त्यावर ( दि. ३ ) एप्रिल सकाळी लाडेवडगाव शिवारात कडबा टाकून जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली होती. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर मोठं आव्हान होतं. तसेच या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी डॉ. संदीप दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कसल्याही प्रकारचा सुगावा नस्ताना तसेच ओळख पटविण्यासाठी कोणताही पुरावा नसताना याचा तपास लावणे हे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून एएसपी पंकज कुमावत यांनी तांत्रिक बाबी वापरुन प्रथम मृतदेहाची ओळख पटविली हा मृतदेह केज तालुक्यातील औरंगपूर येथील विठ्ठल ( अशोक ) धायगुडे ( वय ३५ वर्ष ) याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीसांनी विठ्ठल विषयी नातेवाईकांकडे चौकशी केली. तसेच घरातील व्यक्ती बेपत्ता असताना कोणाची तक्रार नाही. त्यामुळे पोलीसांना नातेवाईकांवरच संशय आला. या चौकशीतून मयताची पत्नीनेच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने विठ्ठलचा काटा काढल्याचे समोर आले. यावरून आरोपी पत्नी सुमिदा विठ्ठल धायगुडे, प्रियकर रामदास किसन शितळकर दोघे रा. औरंगपूर ता. केज यांना अटक केली. या दोघांनाही आज न्यायालया समोर उभे करण्यात येणार आहे.