लाच घेताना महावितरणची महिला कर्मचारी चतुर्भूज
बीडच्या सरकारी बाबूंनी लाचलुचपत अधिकाऱ्यांना निवांत राहूच न देण्याची शपथ घेतली
लोकगर्जनान्युज
बीड : वीज चोरी पकडल्यानंतर तो प्रकरण बाहेर न येऊ देण्यासाठी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याने १६ हजारांची लाच मागितली होती. ते लाचेचे १६ हजार रुपये घेताना दोघांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी बाबूंनी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवांत राहूच न देण्याची शपथ घेतली का? असा प्रश्न वाढत्या लाचखोरांच्या कारवाईमुळे उपस्थित केला जात आहे.
महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायक असलेली पुनम लहू आमटे असे लाचखोर महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. धानोरा रोड येथे एका विद्युत ग्राहाकाची वीज चोरी पकडली होती. तो प्रकार उघडकीस न आणता मिटवून घेण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १६ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेचा सापळा लावला होता. यावेळी लाच स्वीकारताना पुनम आमटे आणि अन्य एक जण असे दोघे चतुर्भूज झाले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्ह्यातील वाढत्या लाचखोरीच्या कारवायांमुळे बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवांत राहूच द्यायचं नाही अशी शपथ घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.