लाच घेताना खाजगी इसम पकडला; तलाठी अन् खाजगी इसमावर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील पिंपळगाव घाट सज्जाच्या तलाठ्याने वाटणीपत्र आधारे मालकी हक्क लावण्यासाठी 15 हजार रु. लाचेची मागणी केली. ही रक्कम खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी तलाठी व खाजगी इसमावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे असलेली पिंपळगाव घाट शिवारातील जमीन 100 रु. बॉण्डच्या वाटणीपत्र आधारे तक्रारदार आणि भावाच्या नावावर 7/12 वर मालकी हक्क नोंद घेण्यासाठी लाचखोर तलाठी दिलीप विष्णू कन्हेरकर ( वय 34 वर्ष ) तलाठी पिंपळगाव घाट रा. पिंगळे नगर बीड याने 17 हजार लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 15 हजार घेण्याचे मान्य केले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याकडे तक्रार केली. यावरून पडताळणी केली असता तलाठ्याने लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. सदरील लाचेची रक्कम खाजगी इसम सहकारी दिगंबर लक्ष्मण गात रा. पिंपळगाव घाट याच्या मार्फत स्वीकरण्याचे ठरले. त्यावरून आज बुधवारी ( दि. 28 ) तल्लठी सज्जा कार्यालय येथे बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेचा सापळा लावला यावेळी पंचासमक्ष तलाठ्यासाठी 15 हजार रु.लाच घेताना खाजगी इसम दिगंबर गातला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तलाठी दिलीप कन्हेरकर आणि दिगंबर गात या दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बीडच्या पथकाने यशस्वी केला.