लग्नातील अनावश्यक खर्च टाळून इन्फंट इंडियाला ३१ हजारांची मदत
केज : लग्न समारंभात आपण नवे कपडे घालून मिरवावे आणि गोडगोड खाण्याची चंगळ असावी अशी सर्वांची अपेक्षा असते. परंतु जे निराधार आहेत; जे दुर्धर आजारांशी लढत आहेत. त्यांचं काय? त्यांनाही अशा कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला मायेची ऊब मिळावी अशी अपेक्षा असते. त्यांची ती अपेक्षा ज्योतिराम जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने स्वतःच्या मुलाच्या लग्नात अनावश्यक खर्च टाळून ३१ हजार रु. चा धनादेश देऊन इन्फंट इंडियाला मदत केली.
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील रहिवाशी आणि आता औरंगाबाद जिल्ह्यातील बजाज नगर वाळूज येथे स्थायिक असलेले ज्योतिराम जाधव व सौ. राधा जाधव यांचा मुलगा चि. वैभव याचा विवाह दि. २० जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यातील जदीदजवळा येथील भीमराव घोलप यांची कन्या चि. सौ. कां. तेजस्विनी यांचे सोबत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अत्यंत देखण्या आणि कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात इन्फंट इंफियाचे सौ.संध्या बारगजे व दत्ता बारगजे यांची विशेष उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या विवाहात जाधव कुटुंबाने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पाली जि. बीड येथील आनंदवन येथील इन्फंट इंडियातील एचआयव्ही बाधित व अनाथ आश्रमातील मुलांसाठी जेवण आणि औषधोपचारासाठी ३१ हजार रु. चा धनादेश मंगलनिधी म्हणून दिला.
या वेळी सौ. संध्या बारगजे व दत्ता बारगजे यांनी स्वतः या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू वरांना चि. वैभव व त्याची नववधू सौ. तेजस्विनी यांना आशीर्वाद दिला व धनादेश स्विकारला. नव दांपत्य वैभव व तेजस्विनी, ज्योतिराम जाधव व त्यांच्या सौभाग्यवती सौ. राधा जाधव यांच्यासह वरपिता ज्योतिराम जाधव यांचे वर्गमित्र महादेव मेटे, दत्ता देशमुख, संजय शेळके, भरत जाधव, डॉ. संतोष नाईकवाडे, इंदर मुंडे, विकास मिरगणे, रामकृष्ण पांचाळ, अर्जुन जाधव, पत्रकार गौतम बचुटे यांच्यासह त्यांचे सर्व वर्गमित्र उपस्थित होते. ज्योतिराम जाधव कुटुंबाच्या या उपक्रमाबदल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.