रोहिण्या कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्राने केले निराश
पहिल्या मोसमी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
केज : तालुक्यात गत हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरले यावर्षी तरी वेळेत पेरणी होऊन चांगले उत्पन्न हाती पडेल अशी अशा शेतकरी ठेवून आहेत. मात्र रोहिणी नक्षत्राने हिरमोड केल्यानंतर मृग नक्षत्राने देखील निराशाजनक सुरुवात केली आहे. सध्या उन्हाचा पारा कायम असून जेरात वारे वाहत आहे तर ढग येतात अन जातात.तरी वरुणराजा कधी बरसतो याची शेतकरीवर्ग प्रतीक्षा करीत आहे.
खरिपाच्या पेरणीवर शेतकऱ्यांची सगळी मदार असते.मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पिकांवर रोगराई कमी पडते आणि उत्पादन चांगले मिळते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली.नेहमीच्या नैसर्गिक संकटामुळे तसेच शेतमालाचे बाजारभाव घसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळ करताना दमछाक होत असून शेतकरी बँकांकडे कर्जासाठी सतत चकरा मारत आहेत.
खरीप हंगामात पेरणी वेळेत व मृग नक्षत्रात होणे अत्यंत आवश्यक मानले जाते.पाऊस वेळेवर होणे गरजेचे आहे. यावर्षी मात्र पावसाची चाहूल लावणारे रोहिणी नक्षत्र अक्षरशः कोरडे गेले.तसेच मृग नक्षत्राने देखील कोरडी सलामी दिली असून हे नक्षत्र सुरु होऊन सात दिवस झाले तरी मोसमी पावसानं हजेरी न लावल्याने यावर्षी मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.