लोकगर्जना न्यूज
केज : बीड येथे सैन्याच्या शाळेत पालेभाज्या रोपांची आवश्यकता आहे. अशी थाप मारुन रोपांची ऑर्डर दिली. रोपे पाठवण्यास सांगितले व ऑनलाईन पद्धतीने क्यू आर कोड व मोबाईल हॅक करुन आडस ( ता. केज ) येथील रोप वाटिका चालकास ३८ हजारांचा गंडा घातल्याची बुधवारी ( दि. २८ ) घटना घडली. याप्रकरणी अद्याप पोलीसात तक्रारी दिली नाही. आज तक्रार देणार असल्याचे फसवणूक झालेल्या रोप वाटिका चालकाने सांगितले आहे.
अनंत शेंडगे रा. आडस ( ता. केज ) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. ते अजय रोपवाटिकेच्या माध्यमातून पालेभाज्या,फळ, फुलं या रोपांचा व्यवसाय करतात. मंगळवारी ( दि. २७ ) सकाळी 7077110239 या नंबर वरुन शेंडगे यांना फोन आला. त्या ठगाने मी आर्मीचा अधिकारी बोलतो म्हणून आम्हाला बीड येथे पालेभाज्या रोपांची गरज असल्याचे सांगितले. फ्लॉवर, टोमॅटो, मिर्ची आणि वांगे या प्रत्येकी ५ हजार रोपांची ऑर्डर दिली. बुधवारी ( दि. २८ ) बीडला पाठवून देण्याचे सांगितले. अनंत शेंडगे यांनी बीडला कुठे पाठवायचे असे विचारले असता ठगाने 9674891294 या मोबाईल क्रमांकावरून लोकेशन पाठवले. बुधवारी ( दि. २८ ) अनंत शेंडगे यांनी सर्व रोपं भरुन टेम्पो बीडला पाठवून दिला. तेथे पोचताच संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने दुपारची सुट्टी झाली असल्याचे कारण सांगून रोपांचे वाहन बीड शहराच्या बाहेर थांबविण्यास सांगितले. बील किती झाले व ते व्हॉट्स ॲपला टाकण्यास सांगितले. रोपांचे एकूण १६ हजारांचे बील टाकताच त्या ठगाने एक नंबर देऊन फोन पे वरून १ रु. टाकण्यास सांगितले. १ रु. मिळताच दोन रुपये परत शेंडगे यांच्या फोन पे वर टाकले. नंतर एक क्यू आर कोड पाठवून त्यावर स्कॅन करा तुमचे १६ हजार जमा होतील असे सांगितले. स्कॅन करताच शेंडगे यांच्या खात्यातील १६ हजार रुपये कटले. आमचेच पैसे कटल्याचे ठगास सांगितले असता आरे चूकून दुसरा क्यू आर कोडा आला. तुमचे १६ हजार आले म्हणून सांगत परत पाठवतो म्हणाला. फोन पे ची ओटीपी पाठवली व ते विचारुन घेऊन पुन्हा २२ हजार खात्यातून काढून घेतले. असे ३८ हजार रुपये जाताच ही फसवणूक झाल्याचे अनंत शेंडगे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांने दुसरं बॅंक खात आहे का? असे ठगाने विचारले पण शेंडगे यांनी माहिती न दिल्याने रक्कम वाचली. याबाबत शेंडगे यांनी पोलीसांकडे तक्रार केली नव्हती. बॅंकेला माहिती देऊन नंतर पोलीसांकडे तक्रार करणार असल्याची लोकगर्जना न्यूजशी बोलताना सांगितले आहे. असे अनेक ऑनलाईन गंडा घालण्याचे अनेक प्रकार समोर येत असून नागरिकांनी सावध राहून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करावेत असे आवाहन करण्यात येत आहे. यापुर्वीही आडस येथे असे फसवणूकीचे प्रकार घडलेले आहेत परंतु कोणीही तक्रार न केल्याने चर्चा झाली नाही.