रेशीम उद्योगावर उझी माशीचे संकट; अनेक शेतकऱ्यांनी केले कोष उत्पादन बंद
जिल्हा रेशीम कार्यालयाने उपाययोजना राबविण्याची मागणी
लोकगर्जनान्यूज
आडस : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगावर मागील काही महिन्यांपासून उझी माशीचे संकट आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याने रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी शेड बंद केले आहेत. या संकटाने रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून जिल्हा रेशीम कार्यालयाने याबाबत जनजागृती करत यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बोंड अळी, लाल्या यांसारख्या रोगामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवून सोयाबीनला प्रथम पसंती दिली. परंतु यावरही येलो मोझ्याक रोगाच्या प्रादुर्भाव आणि पडलेले दर पहाता खर्च निघणं मुश्किल झाले. यातच तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादनाकडे काही शेतकरी वळले. रेशीम उद्योग हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे पीक असून, महिन्याला यातून चांगले उत्पन्न मिळू लागले. यामुळे आडस परिसराचा विचार केला तर अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन रेशीम कोष उत्पादन स्विकारले. आडससह परिसरात ५०० च्या जवळपासच्या रेशीम कोष उत्पादनाचे शेड असतील. यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने यात वाढ होत आहे. रेशीम उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसली आहे. संकट शेती आणि शेतकऱ्यांची पाट सोडत नाही हे दिसत असून यावरही मागील काही महिन्यांपासून उझी माशीचे संकट आले. या उझी माशी मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात २५ ते ८० टक्के घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणं मुश्किल झाले. मेहनत वाया जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अंडपुज ( चॉकी ) न घेता उत्पादन बंद करून शेड रिकामे ठेवले आहेत. शेड रिकामे असलेतरी तुती जगविण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते आहे. उत्पन्न बंद आणि खर्च सुरू एकंदरीत अशी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती झाली. हे पहाता हा शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. रेशीम शेती व शेतकरी वाचविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने उझी माशी बाबतीत मार्गदर्शन व उपायोजना शिबिर राबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
उझी माशी कसे नुकसान करते
रेशीम तयार करणाऱ्या अळी वर बसून उझी माशी अंडी देते. ही अंडी अळीच्या आत जाऊन त्यास खाते अन् माशीमध्ये रूपांतरित होऊन पोट फाडून बाहेर पडते. यामुळे रेशीम कोष तयार होत नाही. तयार झालेतर छिद्र पडल्याने तो कचऱ्यात जमा होतो. बाहेर येऊन पुन्हा त्याची अंडी देण्याची प्रक्रिया सुरू होते. एका माशी पासून हजारो माश्या तयार होतात.
४० टक्के नुकसान
मी १५० अंडीपुज ( चॉकी ) घेतली होती. परंतु त्यात केवळ ८६ किलो माल निघाला, जर उझी माशीचे संकट नसतेतर मला दिड क्विंटल माल निघाला असता. यात ६४ किलो माल कमी निघाल्याने माझे ४० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले.
मुरली काळे
रेशीम उत्पादक शेतकरी, आडस
उझी माशीवरील परोपजीवी किटक शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे
उझी माशीचे संकट दूर करण्यासाठी रेशीम संशोधन योजनेतून उझी माशीवरील परोपजीवी कीटक ( निसोलायनक्स थामस असे नाव आहे ) तयार करण्यात आले. हा किटक उझी माशीचे अंडी खाऊन होणारी निर्मिती रोखून त्याचा नायनाट करतो. हे किटक अगोदर फक्त मैसूर येथे मिळत होते. पण आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे निर्माण केले जात आहे. त्यामुळे ज्या भागात उझी माशीचे संकट आहे त्या भागातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना निसोलायनक्स थामस किटक उपलब्ध करून द्यावे.
शेख अब्बास ( मुसा ) करीम
रेशीम उत्पादक शेतकरी
आडस ता. केज
१०० चॉकीत फक्त ५० किलो उत्पन्न
१०० अंडपुजी ( चॉकीची ) बॅच घेतली. याला सरासरी एक क्विंटल उत्पादन होणे अपेक्षित आहे. परंतु ३ मार्चला माझी बॅच निघाली असून उझी माशी मुळे उत्पन्न ५० टक्के घटले असून केवळ ५० किलो कोष उत्पादन झाले. याच कारणामुळे मालही दर्जेदार नसल्याने दरही प्रति किलो ३५० रुपये मिळाला. हे नुकसान टाळण्यासाठी उझी माशीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही तरी उपाययोजना करावी अन्यथा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी रेशीम शेतीही तोट्यात जाऊन बंद होईल.
ओमकार शेळके
रेशीम उत्पादक शेतकरी, आडस
ता. केज