रेल्वेचे स्वप्न! आष्टी करांचे साकार:बीड-परळीच्या नशिबी प्रतीक्षा कायम
अहमदनगर-आष्टी मार्गावर रविवार वगळून डेमू रेल धवणार
लोकगर्जना न्यूज
बीड : अहमदनगर -बीड-परळी रेल्वेचे बीड जिल्ह्याची जनता अनेक वर्षांपासून स्वप्न पहात आहे. हे स्वप्न सध्या दृष्टीक्षेपात येताना दिसत आहे. पहिलं पाऊल आज अहमदनगर ते न्यू आष्टी डेमू रेल्वे सुरू झाल्याने पडले आहे. आष्टी करांच्या आनंदाला आज पारावर उरला नाही. परंतु बीड-परळीच्या जनतेच्या नशिबी प्रतीक्षा आहे. ती किती वर्ष रहाणार हा प्रश्न आहे.
अहमदनगर -बीड-परळी हा एकूण २६१ कि.मी.चा रेल्वे मार्ग आहे. सध्या अहमदनगर ते न्यू आष्टी असा ६६ कि.मी. चा मार्ग वर्षभरापूर्वी पूर्ण झाला. याची मागेच चाचणी ही झाली. तेंव्हा पासून आष्टी पर्यंत रेल्वे सुरू होणार अशी चर्चा होती. यापुर्वीही एकदा तारीक निश्चित झाली. परंतु रेल्वे काही सुरू झाली नाही. त्यामुळे आष्टी करांचे डोळे रेल्वेकडे लागले होते. अखेर तो दिवस उजाडला आज शुक्रवारी ( दि. २३ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रेल धावली. यावेळी रेल मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, खा. सुजय विखे पाटील, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, मा.आ. भिमसेन धोंडे, शिवाजी कर्डिले यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सदरील डेमू रेल रविवार वगळून दररोज सहा दिवस अहमदनगर ते न्यू आष्टी अशी धावणार आहे. हे अंतर ६६ कि.मी. असून या दरम्यान ६ थांबे असतील. सकाळी ७:४५ ही गाडी अहमदनगर येथून सुटेल न्यू आष्टी स्थानकावर १०:३० पोहचेल तर न्यू आष्टी स्थानकावरून ११:०० ला सुटून, अहमदनगर येथील येथे १३:५५( १:५५ ) दुपारी पोहचेल असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदनगर -परळी ही रेल्वे मागास बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी ठरणार आहे. त्यामुळे रेल्वे सुरू व्हावी अशी जनतेची मागणी आहे. यासाठी स्व. केशर काकु क्षीरसागर, स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. विलासराव देशमुख यांनी अनेक प्रयत्न केले. तसेच पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नातून यासाठी मोठा निधी खेचून आणला मोठ्या प्रमाणात या मार्गाचे माती काम, पुलं झाले आहे. तर आष्टी पर्यंत काम पूर्ण झाले. स्वप्न पुर्तीच्या दिशेने एक पाऊल पडलं आहे. परंतु आणखी १९५ कि.मी. चे काम अर्धवट आहे. यामुळे रेल्वे सुरू झाल्याने आष्टी करांचे स्वप्न साकार झाले पण बीड, परळी करांना प्रतिक्षा करावी लागते आहे. जिल्ह्याचे स्वप्न लवकर साकार व्हावे व परळी पर्यंत रेल्वे यावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.