रात्री प्रवास करताय सावधान! रस्त्यावर पडलेली वस्तू घेण्यासाठी थांबताय ? चोरटे दबा धरून बसलेले असतील
रस्त्यावर जॅक टाकून लुटल्याच्या पंधरा दिवसांत दोन घटना

केज : रस्त्यावर जॅक टाकून प्रलोभन दाखवून वाहन धारकांना लुटण्यात येत असल्याच्या केज-मांजरसुंबा रस्त्यावर पंधरा दिवसांत दोन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या वस्तू दिसली तर सावधानता बाळगावी व न थांबता पुढे निघून जावं अन्यथा दोघा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काही दिवसांपुर्वी केज-मांजरसुंबा रस्त्यावर जॅक टाकून प्रलोभन दाखवण्यात आले. ते जॅक घेण्यासाठी कार चालकाने वाहन थांबवताच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी हल्ला करुन बेदम मारहाण करत कार चालकाला लुटल्याची घटना ताजी आहे. अशीच घटना आज उघडकीस आली. नांदूर ( ता. अहमदपूर ) येथील महेश मालवाड आणि गोविंद निवृत्ती कुंटे ( ट्रक चालक ) हे दोघं ट्रक घेऊन येताना मस्साजोग येथील देशमुख पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता रस्त्यावर एक जॅक पडलेलं ट्रक चालकाला दिसून आलं. एखाद्या वाहनातून जॅक पडला असेल म्हणून चालकाने जॅक घेण्यासाठी ट्रक थांबवून खाली उतरला. याच वेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी ट्रक चालकावर झडप घालून लाकडी दांड्याने मारहाण केली. चाकूचा काढताच चालकाने कशीबशी चोरट्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. तोपर्यंत ट्रकमध्ये बसलेल्या सहकार्याने प्रसंगावधान राखत ट्रक सुरू करुन पुढे घेतला चालक चालत्या ट्रकमध्ये बसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु इतक्या वेळेत चोरट्यांनी दोन मोबाईल व इतर असे १२ हजार ५०० रु. ऐवज काढून घेतला. सदरील घटना रात्री पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी ट्रक चालक गोविंद निवृत्ती कुंटे यांनी फिर्याद दिली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत. रात्री प्रवास करणाऱ्यांनो सावधान म्हणून जागरुक व्हा म्हणून आवाहन करण्यात येत आहे.