रात्रीच्या अपघातातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकगर्जनान्यूज
केज : मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोग जवळ सोमवारी रात्री झालेल्या एसटी – पिकअप अपघातातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दुसऱ्या जखमीचला उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाची धारुर आगारची बस क्रमांक एम. एच. १४ बी टी २५१५ आणि सोयाबीन काढून घराकडे परत घेऊन चाललेलं पिकअप क्रमांक एम.एच. ३२ बी ९७३६ या दोन वाहनांची केज-मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग जवळ सोमवारी ( दि. १७ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये पिकअप मधील मजुर आदिनाथ मच्छिंद्र घोळवे ( वय ३० वर्ष ) रा. मुंडेवाडी, बाबासाहेब शंकर ठोंबरे ( वय ३६ वर्ष ) रा. दहिफळ व. हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी फोन करून रुग्णवाहिका बोलावून तातडीने दोघा जखमींना उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान आदिनाथ मच्छिंद्र घोळवे या जखमीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुसरे जखमी बाबासाहेब ठोंबरे यांना लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या अपघातांच्या घटना पहाता वाहन चालकांनी सुरक्षित ड्रायव्हिंग करावी, वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, वेग मर्यादा सांभाळावी असे मत व्यक्त केले जात आहे.