राज ठाकरे यांच्या विरोधात परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
परळी : जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला.
२००८ मध्ये राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी परळी येथे धर्मापूरी पॉईंटवर सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करून समोरील काच फोडली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले . या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . याप्रकरणी पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. परंतु न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ . एम . एम . मोरे / पावडे यांनी दिला .