राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी;बीड जिल्ह्यातील येथे मिळतोय प्रतिक्विंटल १२ हजाराचा दर
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील या ठिकाणी राजमा खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. डायमंड या वाणाला प्रतिक्विंटल १२ हजारांचा दर असून या खालोखाल वाघा आणि वरुण हे वाण आहेत. राजमा ( घेवडा ) दर पहाता सोयाबीन, कापसाने मारले तर राजमाने तारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
कापूस या पिकावर सतत रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली. यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने हे प्रमुख पीक ठरले आहे. यासोबतच शेतकरी राजमा ( घेवडा ) पिकाकडे वळले असून खरीप व रब्बी दोन्ही हंगामात हे येणारं पीक आहे. तसेच कमी वेळात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून राजमा कडे पाहिले जाते. त्यामुळे केज, धारुर, अंबाजोगाई सह पुर्ण बीड जिल्ह्यात काही भाग वगळला तर राजमाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. वाढते पीक पहाता बाजारात आवकही चांगली आहे. यामुळे आडस ( ता. केज ) येथे कार्तिक ट्रेडिंग कंपनी येथे सोयाबीन, कापूस हरभरा, तुरीची खरेदी बरोबर राजमा खरेदीला सुरुवात करण्यात आली. येथे राजमाला दरही चांगला दिला जात आहे. सोमवारी ( दि. ६ ) डायमंड १२ हजार, वाघा ९५०० ते ९२००, वरुण ५८०० ते ५१०० असा दर होता. होळ ( ता.केज ) येथील शेतकरी दत्ता घुगे यांचा वाघा हा राजमा ९ हजार २०० प्रतिक्विंटल प्रमाणे ४ क्विंटल २४ किलो घेतला असून दोन दिवसात तब्बल ३० टन राजमाची आवक झाल्याची माहिती काशिनाथ आकुसकर यांनी दिली. हे दर पहाता शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. सोयाबीन, कापूस दररोज कमी होत असल्याने या तुलनेत राजमाचे दर चांगले असल्याने राजमाने शेतकऱ्यांना तारले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
डायमंड वाण आपल्याकडे कमी
राजमाचे डायमंड हे वाण आपल्याकडे कमी आहे. परंतु वाघा आणि वरुण हे वान मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वाघा या वानाला ९ हजार ५०० रु. प्रतिक्विंटल दर आहे. हे एक नंबर मालाचे असून, यात किड,माती अथवा इतर काही असेल तर २०० ते ३०० रु. कमी होतात.
काशिनाथ आकुसकर
व्यापार, कार्तिक ट्रेडिंग कंपनी