रब्बी पीक विम्यापासून गरीब अन् सामान्य शेतकरी वंचित
दोघांमध्ये फक्त बांध एकाला विमा दुसऱ्याला नाही
लोकगर्जनान्यूज
बीड : हरभरा, ज्वारी पीक नुकसानीचा विमा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला. परंतु ज्यांनी तक्रार केली आणि पंचनामा झाला त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून, गरीब, अशिक्षित शेतकरी मात्र वंचित असल्याचे दिसून येत आहे. विमा मिळालेला शेतकरी व वंचित शेतकऱ्यांच्या मध्ये फक्त बांध आहे.यामुळे पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन तक्रारींची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी सामान्य शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना याची भरपाई मिळावी म्हणून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु यात विमा कंपन्यांनी अनेक अटी, शर्ती लागू केल्या असल्याने या योजनेचा अशिक्षित, गरीब, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण नुकतेच रब्बी हंगामातील हरभरा पीक विमा वाटप वरुन दिसते. जिल्ह्यात काही भागात मागील रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत ऑनलाईन तक्रार केली किंवा ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील तीन दिवसांपासून पीक विमा जमा होत आहे. परंतु विमा मिळालेला शेतकरी अन् ज्यांना नाही मिळालं त्या दोघांमध्ये केवळ बांध असून, केवळ त्याकडे स्मार्टफोन नाही,अथवा त्यास ऑनलाईन तक्रार करता येत नाही. या कारणांमुळे तो शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहीला आहे. यामुळे जो खरा गरीब आणि सामान्य शेतकरी आहे तोच पीक विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे नुकसानभरपाई पासून वंचित रहात असल्याचे चित्र आहे. परंतु यावर कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पीक विमा कंपनीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.