या मल्टिस्टेटच्या संचालक मंडळावर फसवणूकीचा गुन्हा दाखल
केज : शहरातील परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट शाखेने मुदत ठेवींवर आकर्षक व जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांची ४४ लाख ७० हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी व्हॉईस चेअरमन, संचालकांसह अधिकाऱ्यांविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
केज शहरातील बसस्थानकाच्या बाजूला सज्जन अंधारे यांच्या गाळ्यात परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटी नावाची शाखा सुरू होती. या शाखेने मुदत ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविल्याने फिर्यादी मनिषा अनंतराव देशमुख ( रा. समता नगर, केज ) यांच्यासह इतर ठेवीदारांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या. मनीषा देशमुख यांनी २४ सप्टेंबर २०१७ रोजी २ लाख १५ हजार रुपयांची ठेव ठेवली. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि व्याज देण्यास चालढकल सुरू केली. तगादा लावल्याने देशमुख यांना ठेवीच्या रक्कमेबद्दल इतर बँकेचे धनादेश दिले. मात्र सदरील धनादेश दिलेल्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने ते धनादेश वटले नाहीत. खोटे धनादेश देऊन फसवणूक केली. तसेच मनीषा देशमुख यांच्यासह इतर ठेवीदारांना ४४ लाख ७० हजार २५९ रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद ८ डिसेंबर २०२१ रोजी मनीषा देशमुख यांनी फिर्याद दिली. यावरून योगेश बबन मस्के, बँकेचे व्हाइस चेअरमन नितीन सुभाष घुगे, बँकेचे सीईओ निखील शिवकुमार मानुरकर, वरिष्ठ शाखा अधिकारी विश्वजीत राजाभाऊ ठोंबरे, शाखा अधिकारी दत्ता भुटाजी रंगदळ, संचालक अनिता राजाभाऊ ठोंबरे, संचालक मालन सुभाष घुगे यांच्यासह इतर बँकेचे संचालक मंडळाविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.