‘या’ तारखेला होणार उपसरपंचांची निवड; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

लोकगर्जनान्यूज
बीड : ग्रामपंचायत निवडणूका होऊन ( दि.२० ) सरपंच व सदस्यांचे निकाल घोषित झाले. यानंतर उपसरपंचांची निवड कधी होणार म्हणून लक्ष लागले होते. याचीही प्रतिक्षा संपली २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान उपसरपंच पदासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आदेश निघाले आहेत. यामुळे आता उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य निवडीसाठी ( दि. १८ ) मतदान घेण्यात आले. ( दि. २० ) मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले. यामुळे नवे कारभारी कोण स्पष्ट झाले. परंतु उपसरपंच पदाची निवड बाकी आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी शनिवारी ( दि. २४ ) आदेश काढले असून, ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ( दि.२६ ) डिसेंबरला संपणार आहे त्या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष बैठक ( दि. २८ ते ३० ) डिसेंबर या तारखेला घ्यावी व त्यामध्ये उपसरपंच पदाची निवड करण्यात यावी तसेच ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ( दि. २७ ते ३१ ) डिसेंबरला संपणार आहे त्यांनी कार्यकाळ समाप्तीच्या दुसऱ्या दिवशी बैठक घ्यावी. या बैठका नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी याची पुर्ण जबाबदारी ग्रामसेवकांची राहिल. यामुळे उपसरपंचाची निवड कधी ही प्रतिक्षा संपली परंतु उपसरपंच कोण? ही उत्सुकता लागली आहे. उपसरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसून येत आहे.