यशोगाथा! एक एकर शेती अन् वार्षिक उत्पन्न ८ लाख: रेशीम शेतीमुळे जगणं झालं मुलायम
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील एका शेतकऱ्याला केवळ एक एकर शेती असून ३० गुंठे भाडेतत्त्वावर घेऊन यात तुती लागवड करुन रेशीम उद्योग सुरू केला. यातून हा शेतकरी वर्षाला तब्बल ८ लाख रुपये उत्पन्न घेत आहे. एकीकडे शेती नुकसानीत तर दुसरीकडे हा आदर्श चेहरा दिसत असल्याने या शेतकऱ्याचे रेशीममुळे जगणं मुलायम झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आज कोणालाही शेती बाबतीत विचारले तर नकारात्मक भावना ऐकण्यात येते. कारणही तसेच आहे. कधी पाऊस झाला तर कधी नाही झाला म्हणून पिकं जाऊन शेती उध्वस्त होत आहे. अन् शेतकरी संकाटात अधिक गाडला जातो. यामुळेच उत्तम शेती कनिष्ठ झाली तर कनिष्ठ नोकरी ( चाकरी ) उत्तम झाली. परंतु आजही शेतकऱ्यांने पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेचा अवलंब केला तर ही काळी माती शेतकऱ्याच सोनं अन् घामाचे मोती करते. याच उत्तम उदाहरण केज तालुक्यातील आडस येथील शेतकरी मुरली बाबुराव काळे आहेत. मुरली काळे यांना केवळ एक एकर शेती आहे. ते म्हणतात मी ही पुर्वी कापूस, हायब्रीड ज्वारी असे पारंपरिक पीक घेत होतो. परंतु हातात काहीच शिल्लक रहात नसे. मग कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावं लागतं असे. पण वाघोली ( ता. धारुर ) येथील मित्र गोविंद गव्हाणे यांनी तुती लागवड करुन रेशीम शेती सुरू केली. ती पाहून मी सन २०१२ मध्ये तुती लागवड करुन रेशीम शेतीला सुरूवात केली. यानंतर शेजाऱ्याची ३० गुंठे जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये ही तुती लागवड केली. या दिड एकराच्या तुतीवर एका वर्षात १० बॅच घेतो. प्रत्येकी बॅच दिड क्विंटल कोष उत्पादन होते. यातून ८० हजार उत्पन्न मिळते. वर्षाचे ८ लाख रुपये एकूण आर्थिक उत्पन्न मिळते. प्रत्येकी बॅच खर्च १५ हजार वर्षाचे दिड लाख वजा करून ६ लाख ५० हजार निव्वळ उत्पन्न आहे. यामुळे मला आता कुणाकडेही काम करण्याची गरज नाही. तुतीचा खत, औषध, फवारणीचा इतर पिकांच्या तुलनेत नगण्य खर्च असल्याचे सांगितले. मुरली काळे यांची रेशीम शेती पाहून पाच ते सहा शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम शेती सुरू करुन तेही सक्षम होत आहेत. २५ एकर शेती असणारे शेतकरी आज संकटात आहेत. पण अल्पभूधारक शेतकरी मजेत असल्याचे चित्र आहे. या १० वर्षात त्यांनी शासनाचा एक रुपया ही अनुदान घेतलं नाही. तसेच पीक विम्यात तुती नसल्याने पीक विमा ही नाही. पण सर्व भागत असल्याचे सांगत मुरली काळे यांनी समाधान व्यक्त केले.
* एकदा लागवड २० वर्ष बिनधास्त
तुती लागवड केल्यानंतर २० वर्ष चालते. यास पाणीही जेमतेम असलेतरी चालते. २० वर्ष फक्त याचा पाला खुडून अळ्यांना टाकावं लागतं. यामुळे दरवर्षी बी-बियाणेच खर्च नाही. शाश्वत उत्पन्न देणारे रेशीम शेती असून, १० वर्षात ३०० रु. प्रति किलो पेक्षा दर खाली नाहीत.
* जेमतेम पाण्याची उपलब्धता असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने तुती लावावीतु
तुती जगविण्यासाठी पाणी उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने लागवड करावी. रेशीम शेतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. नोकरदार प्रमाणे प्रत्येक महिन्याला हातात पैसा देणारं हा पीक आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट होईल.
मुरली काळे
रेशीम उत्पादक शेतकरी,आडस