लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : टिप्पर व आप्पे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना धारुर-तेलगाव रस्त्यावर थेटेगव्हाण ( ता. धारुर ) जवळ काही वेळापूर्वी घडली आहे. जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
असुरक्षित रस्त्यांमुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या अपघातांनी प्रवासी व वाहन चालकांच्या मनात धडकी भरवली असून, आजही काही वेळा पुर्वी धारुर तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. धारुर शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील थेटेगव्हाण जवळ खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणारा आप्पे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. हा अपघात इतका भीषण आहे की, आप्पे रिक्षाचा चुराडा झाला असून सुभाष बडे, हौसाबाई घुले, भागवत घुले, संगीता रामा घोळवे, गधळण तिडके हे सहाजण गंभीर जखमी असून जखमींना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सुदैवाने यात जिवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या महामार्गावर नेहमीच अपघात घडत असून याला अरुंद रस्ता कारणीभूत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.