मोठी बातमी! धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाची एक हाती सत्ता
लोकगर्जनान्यूज
धारुर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडीसाठी गुरुवारी ( दि. १५ ) मतदान झाले. आज शुक्रवारी ( दि. १६ ) निकाल घोषित झाले. १८ पैकी १७ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. १७ जागांवर विजय मिळवून भाजपाने एक हाती सत्ता मिळवली असून हा आमदार प्रकाश सोळंके यांना धक्का मानला जात आहे.
निवडणूकीच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनलच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा समर्थक पॅनलची एक जागा बिनविरोध आली होती. यामुळे १७ जागेची निवडणूक लागली होती. सरळ लढत आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध भाजपाचे रमेश आडसकर आणि राजेभाऊ मुंडे अशी झाली. या निवडणूकीतील रमेश आडसकर आणि राजेभाऊ मुंडे यांच्या पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. बिनविरोध एक असे १८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे तालुक्यातील म्हत्वाच्या संस्थेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असल्याने हा आमदार प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.