मुलं पळवणारी टोळी…अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई – नंदकुमार ठाकूर
बीड पोलीसांच्या चौकशीत ठरली निव्वळ अफवा
लोकगर्जना न्यूज
बीड : मुलं पळवणारी टोळी आल्याची जोरदार चर्चा आहे. याची बीड पोलीसांनी सखोल चौकशी केली असता ही निव्वळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत काही जण जुने व इतर ठिकाणचे व्हिडिओ बीड येथील असल्याचे सांगून सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची जोरदार अफवा पसरवली आहे. यामुळे मुलं व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलं घाबरत असून त्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना जावं लागतं आहे. याची बीड पोलीसांनी दखल घेऊन सखोल चौकशी केली. मुलं पळवणारी टोळी यात काहीच तथ्य नाही. ही एक अफवा आहे. तरीही खबरदारी म्हणून शाळा व गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली आहे. पालकांनी थोडं जागरुक रहावे. तसेच काही जण जुने, बाहेरील कुठलेही व्हिडिओ बीडचे असल्याचे सांगून सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत. असे खोटे व्हिडिओ शेअर करु नये जर असे व्हिडिओ कुठे आढळले तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आपल्या गल्लीत, शाळे जवळ, गावात कोणी अनोळखी संशयित व्यक्ती आढळून आली तर, जवळच्या पोलीस ठाणे किंवा 02442-222333, 02442-222666 या नंबरवर अथवा ११२ हेल्पलाईन नंबरवर फोन करून पोलीसांना माहिती द्यावी. विशेष म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला मारहाण करुन कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.