मुख्याध्यापक शेख ए.डी. यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात पार पडला
मानवतेचा ओलावा असणारा व्यक्ती समाजाचा शिक्षक ठरतो – नामदेवराव क्षीरसागर
गोरगरीबांची लेकरं घडविने हेच शिक्षकांचं खरं काम – नंदकिशोर मुंदडा
लोकगर्जनान्यूज
केज : ज्या व्यक्तीच्या मनात मानवतेचा ओलावा असतो तो समाजाचा शिक्षक ठरतो हे काम शेख असहाबोद्दीन यांनी केल्याचे मत ज्येष्ठ संपादक नामदेवराव यांनी व्यक्त केली. गोरगरीबांची लेकरं घडविने हे सतीचे वाण असून हे वाण घेऊन शेख असहाबोद्दीन यांनी केले असल्याचे गौरवद्गार जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केकाणवाडी ( ता. केज ) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शेख ए. डी. यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात बुधवारी ( दि. ४ ) बोलताना काढले.
आडस केंद्र अंतर्गत असलेल्या केकाणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख असहाबोद्दीन दस्तगीर हे नियमाप्रमाणे वय झाल्याने ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने बुधवारी ( दि. ४ ) दुपारी १ वाजता केकाणवाडी ग्रामस्थ व आडस केंद्राच्या वतीने सेवापुर्ती सोहळा आयोजित केला. यावेळी शेख असहाबोद्दीन यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर म्हणाले की, सरळ स्वभावाचं माणूस म्हणून असहाबोद्दीन सर कडे पहातो. सामाजिक भान राखत आयुष्यात वाटचाल केली. शिक्षणक्षेत्रात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा इतकं मोठं सन्मान, सत्कार होणं ही गौरवाची बाब असून असा भव्यदिव्य सेवापुर्ती कार्यक्रम मी पाहिला नाही. हेच प्रेम असहाबोद्दीन सर यांच्या कामाची पावती आहे. मानवतेचा ओलावा असणारा व्यक्ती समाजाचा शिक्षक ठरतो असे म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, असहाबोद्दीन सर म्हणजे चौकोनी चिरा असून, ते शाळेत आले की, शिक्षक, शाळा सुटल्यावर साहित्यिक, लेखक अन् मित्रांमध्ये रमणारा मित्र, आज पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे आहे. परंतु गोरगरीबांच्या लेकरांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हाच आधार आहे. याच शाळांमध्ये गोरगरीबांची लेकरं घडवून शिक्षक सतीचे वाण जपत आहेत. माणसं जोडणं सोपं असून ते टिकवून ठेवणे अवघड आहे. परंतु शेख असहाबोद्दीन यांनी हे काम आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने केले. ही कमविलेली माणसं समोर दिसत असून हीच खरी कामाची पावती आहे. तर युवा नेते ऋषिकेश आडसकर म्हणाले की, शेख असहाबोद्दीन सरांनी शिक्षक म्हणून ज्ञानदानाच्या कामात कसलीही तडजोड केली नाही. त्यामुळे ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आडस परिसरात परिचित आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले असल्याची आठवण करुन देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आदी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सांगता ह.भ.प. श्रीकृष्ण चवार महाराज यांच्या वाणीणे करण्यात आली. यावेळी सुदर्शन सोळंके, विजयकुमार खुळे, रविकिरण देशमुख, अनिल जोशी, शेषेराव गडदे, इंज. कांताराव सोळंके, प्रशांत आदनाक, सुनील आडसुळ, नवनाथ सोनवणे, महानुभाव , नागेश औताडे, अनिल महाजन, परमेश्वर गित्ते, रामदास साबळे, राम माने यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव थोरात यांनी केले.
मयत सहकार्याच्या कुटुंबाला शिक्षकांची आर्थिक मदत
आसरडोह ( ता. धारुर ) येथील शिक्षक नितीन पाटोळे यांचे मागील काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. नवीन शासन निर्णयानुसार त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळत नाही. तर अंशकालीन कर्मचारी म्हणून संधी नाही. त्यामुळे या शिक्षकाचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे धारुर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत ८४ हजार रुपये जमा करुन नितीन पाटोळे यांच्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी ४२ हजार असे ८४ हजार ठेवी जमा केली. याची पावती आज मान्यर पाहूण्यांच्या हस्ते देण्यात आली.