मुख्याध्यापक, शिक्षिकेचा वाद टोकाला शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
माजलगाव : तालुक्यातील राजेवाडी येथील मुख्याध्यापक आणि याच शाळेतील शिक्षिका यांच्यातील वाद टोकाला पोहोचला. या वादामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या शिक्षिकेने विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली.
मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि सह शिक्षिका यांच्यातील वाद तसेच गावातील राजकीय हस्तक्षेपामुळे राजेवाडी येथील प्राथमिक शाळा चार दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सोमवारी खुलासा सह सर्वांनी हजर रहावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी नोटीस बजावली आहे . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता हे वाद संपुष्टात आणण्याचा माजलगावचे गट शिक्षण अधिकारी यांनी प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. मुख्याध्यापक व संबंधित शिक्षिका या दोघांनाही चौकशीअंती निलंबित करण्याबाबत अहवाल गटशिक्षण अधिकारी यांनी यापूर्वीच पाठवलेला आहे . शाळा बंद होणे, मुख्याध्यापकांचा त्रास, राजकीय हस्तक्षेप हे पहाता शिक्षिकेने मानसिक ताणावातून आज ( दि. ४ ) सकाळी ११ च्या सुमारास शाळेतच विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच तात्काळ सदरील शिक्षिकेला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.या घटनेने माजलगाव तालुक्यात एकाच खळबळ उडाली असून, या वादाने गंभीर वळण घेतल्याचे दिसून येत आहे .