माजलगाव रोड रॉबरीचा एलसीबीने केला पर्दाफाश; आरोपी पाहून बसला धक्का….!
लोकगर्जना न्यूज
माजलगाव जवळील केसापुरी येथे ( दि. १५ ) रात्री १२ वाजत अज्ञातांनी टेम्पो अडवून अडीच लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा एलसीबीने तपास करून अवघ्या २४ तासात संशयित आरोपी जेरबंद केले आहेत. फिर्यादीच आरोपी निघाल्याने काही वेळासाठी पोलीस ही चक्रावून गेले.
चालक शेख अख्तर शेख पाशा ( वय ३२ वर्ष ) रा. किल्ला वेस, बीड हा त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक एम.एच. ४३ वाय २५८४ घेऊन बीड येथून मुर्तीजापूर ( जि. वाशीम ) कडे सरकीचे गंधक आणण्यासाठी माजलगाव मार्गे जाताना केसापुरी जवळ विना नंबरच्या दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी टेम्पो अडवून गाडी कशी चालवतो असे विचारुन पाठी मागे बघ म्हणाले. मी गाडी थांबवली व मागे येऊन पहाताना मला व सोबत असलेल्या विजयकुमार सुरजप्रसाद गुप्ता यांना मारहाण केली. २ लाख ४५ हजार रुपये बळजबरीने घेऊन पसार झाले. अशी फिर्याद टेम्पो चालक शेख अख्तर याने दिली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाणे माजलगाव मध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे एलसीबी पथकाला आदेश दिले. घटनेचा तपास करताना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, हा गुन्हा टेम्पो चालकानेच त्याच्या सहकार्याच्या मदतीने घडवून आणला. या संशयावरून एलसीबी पथकाने तेलगाव नाका, बीड येथून शेख अख्तर शेख पाशा, शेख रफीक शेख लतीफ या दोघांना जेरबंद केले. या दोघांनाही दोन साथीदारांच्या सहकार्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयितांना माजलगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. फिर्यादीच आरोपी निघाल्याने पोलीसही चक्रावून गेले होते.