माजलगावात दुर्दैवी घटना! धरणामध्ये बुडून डॉक्टरचा मृत्यू
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : येथील धरणामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी ( दि. १८ ) सकाळी ८ वाजता घडली आहे. पाणी जास्त असल्याने ५ वाजेपर्यंत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. बीड येथील एनडीआरएफ चे पथक प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी माजलगाव येथील तहसीलदार, पोलीस, नगरपालिका कर्मचारी तळ ठोकून आहेत.
डॉ. दत्ता श्रीमंत फपाळ रा. बेलुरा ( ता. माजलगाव ) असे मयत डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे तेलगाव ( ता. धारुर ) येथे अजिंक्य हॉस्पिटल असून ते या भागातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. डॉ. फपाळ हे माजलगाव येथे वास्तव्यास आहेत. ते दररोज मित्रांसोबत माजलगाव येथील धरणावर पोहण्यासाठी जात असे नेहमीप्रमाणे आज रविवारी ते पोहण्यासाठी धरणावर गेले होते. यावेळी ते पोहण्याच्या नादात बरेच लांब पाण्यात गेले. परत येताना त्यांना दम भरला व ते पाण्यात बुडाले आणि वरच आले नाही. ही माहिती मित्रांनी पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीस, तहसीलदार, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पाणी जास्त असल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी येत असल्याने बीड येथून एनडीआरएफ पथक पाचारण करण्यात आले. ते सध्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. ५ वाजेपर्यंत यश आले नाही. डॉ. फपाळ यांनी कोरोनाच्या संकट काळात सेवा देत अनेकांना आधार दिला. तसेच तेलगाव परिसरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असल्याने या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.