मांजरानदी जवळ नादुरुस्त रस्ता अन् केज च्या समस्यांसाठी रास्तारोको आंदोलनाचा इशारा
लोकगर्जनान्यूज
केज: सतत पाठपुरावा करूनही मांजरा नदी पुलाजवळील अंदाजे एक किमी नादुरुस्त रस्ता तात्काळ मजबुती व डांबरीकरण करा तसेच केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरू करा आणि एचपीएम व मेगा कंपनीची केज शहरातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या सोमवारी ( दि.18 ) सकाळी 11 पासून मांजरा नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले यांनी दिला.
समितीने या विषयाचे निवेदन केजचे तहसीदार यांच्यासह कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी जालना, मेगा व एचपीएम कंपन्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात मेगा कंपनीने खामगाव पंढरपूर महामार्गावर कळंब नजीक मांजरा नदी पुलाजवळचा अंदाजे एक किमी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा ही प्रमुख मागणी करण्यात आली. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पडलेले खड्डे, धूळ व भेगा यामुळे हा रस्ता दुचाकी व इतर हलक्या व अवजड वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. तसेच रस्त्यावरील या अडथळ्यामुळे व वाहनगती कमी होत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नवीन पुलाचे काम अद्याप किमान दोन वर्षे पूर्ण होईल अशी शक्यता नाही अशा वेळी जनतेसाठी पर्यायी रस्ता चांगल्या अवस्थेत देण्याची जबाबदारी व त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद असताना मेगा कंपनी जाणून बुजून नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप समितीने केला आहे. केज शहरातही मेगा कंपनीने विठाईपुरम ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंतचे नाली बांधकाम पूर्ण केलेले नाही. धारूर रस्त्यावरील पथदिवेही कंपनीने सुरू केलेले नाहीत.
दुसरीकडे एचपीएम कंपनीने केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौकापर्यंतचे दोन्ही बाजूने 2 मीटर रुंदीकरणाचे व नाली बांधकाम, तसेच केजडी नदीवरील पुलाचे काम कंपनी अत्यंत संथ गतीने करत आहे. याही कंपनीने बीड- अंबेजोगाई महामार्गावर अद्याप पथदिवे सुरू केले नाहीत. ही सर्व प्रलंबित कामे वरील दोन्ही कंपन्यांनी तात्काळ पूर्ण करावीत या मागणीसाठी केज विकास संघर्ष समिती येत्या सोमवारी ( दि.18 ) सकाळी 11 मांजरा नदी पुलावर जनतेच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको करणार असल्याची माहिती हनुमंत भोसले यांनी दिली. या आंदोलनात नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या निवेदनावर नासेर मुंडे, संपत वाघमारे, शेषराव घोरपडे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.