मांगवडगाव तिहेरी हत्याकांड खटल्यात पाचजणांना जन्म ठेप
अंबाजोगाई : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालु होता. दुसरे सत्र न्यायाधीश मा. व्ही.के. मांडे यांनी पाच आरोपींना दोषी ठरवून जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हे पारधी समाजाचे असून, फिर्यादी व आरोपीमध्ये जमीनीवरून वाद आहे. या वादातून आरोपींनी मयत बाबु शंकर पवार यास सन २००६ मध्ये मारहाण केली. या जमिनी बाबत कोर्टात ही वाद सुरू होता. नंतर सदर जमीनीच्या वादाचा निकाल हा फिर्यादीच्या बाजूने लागला . म्हणून ते दि. १३ मे २०२० रोजी सांयकाळी फिर्यादी, मयत बाबु शंकर पवार त्याचे मुले, सुना असे सर्व जण वादग्रस्त जमीनीवर जिवनावश्यक सामानासह ट्रॅक्टरने गेले. हे पुर्ण कुटुंब शेतात आल्याचं पाहून आरोपींनी चिडून त्यांचेवर शस्त्रासह दगड फेकुन हल्ला चढवून ट्रॅक्टर अंगावर घातले व त्यांना गंभीर मारहाण केली. यामध्ये बाबु शंकर पवार, संजय बाबु पवार, प्रकाश बाबु पवार या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मारहाणी मध्ये दादुली प्रकाश पवार ही महिला गंभीर जखमी झाली होती. परंतु उपचारांमुळे तिचा जिव वाचला. धनराज बाबु पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबु पवार, संतोष संजय पवार इत्यादी देखील गंभीर जखमी झाले. सदर प्रकरणात फिर्यादी धनराज बाबु पवार याचे फिर्यादीवरून पो.स्टे. युसुफवडगाव येथे गु.र.नं. १०६/२०२० कलम ३०२, ३०७, १२० ब, ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४२७, ३२३ भा.द.वी. सह कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३ (१) (g), ३(२) (ra), ३ (२) (r) अ. जा. ज. अ. प्र. कायद्यान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आरोपींना अटक करून गुन्हाचा तपास पोलीस अधिकार राहुल धस यांनी करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जखमी साक्षीदार, डॉक्टर, पोलीस अधिकारी वगैरे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व ती साक्ष ग्राहय धरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपी क्र. १) सचिन मोहन निंबाळकर, २) हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, ३) बालासाहेब बाबुराव निंबाळकर, ४) राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर, ५) जयराम तुकाराम निंबाळकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. ए. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना ॲड. आर. एम. ढेले, ॲड. नितीन पुजदेकर यांनी सहाय्य केले. पोलीस पैरवी गोविंद कदम, पो. कॉ. बाबुराव सोडगीर यांनी केली.