शिक्षण संस्कृती

महिला महाविद्यालयात असे रंगले बहारदार कविसंमेलन विष पिण्यापूर्वी मिळावा एक होकार मीरेचा…

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात मराठी विभागाचा उपक्रम

गेवराई : “माझ्या वेदनेस हवा,
एक जिव्हाळा राधेचा…
विष पिण्यापूर्वी मिळावा,
एक होकार मीरेचा…”
अशा आर्त स्वरातील प्रा. बापू घोक्षे यांच्या कवितेने महिला महाविद्यालयातील कविसंमेलनाची शानदार सांगता झाली.

मराठी भाषा पंधरवाडा अंतर्गत जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाने कथालेखिका प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन केले होते. यात सहभागी झालेल्या कविंनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून कविसंमेलनाला रंगत आणली.

संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कविसंमेलनाचे रसग्रहण करतांना सांगितले की, संमेलनात सादर झालेल्या सर्वच कविता आशयगर्भ आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या होत्या. जिवंत मनाची प्रत्येक व्यक्ती कविता करू शकते असा विश्वास देत प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण करून दिली,
“पाठीवरती हात ठेऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा…”

सुप्रसिद्ध लेखक- पत्रकार- समाजसेवक डॉ. अनील अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत कविसंमेलनाला प्रारंभ झाला. मराठी विभाग प्रमुख प्रा. बापू घोक्षे यांनी डॉ. अवचट यांच्या साहित्य आणि समाजकार्याचा आढावा घेतला. सर्वांनी स्तब्ध उभे राहून दिवंगत डॉ. अनील अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“संमेलनात पहिली कविता सादर करायला ‘जिगर’ लागते, ‘फिगर’ नाही…”
अशी मल्लीनाथी करीत सूत्रसंचालक प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांना पहिली कविता सादर करण्याचे आमंत्रण दिले. त्यावर त्यांनी-
“इथं प्रत्येकाला वाटतं, आपण किती शहाणे…
त्यासाठी ते निवडतात,
किती – किती बहाणे…”
अशी चारोळी सादर करीत रसिकांची दाद मिळवली.

एका नैराश्यग्रस्त तरुणीच्या आत्महत्त्येच्या सत्यघटनेवरील “आयुष्य जगून तर पहा,” ही आशावाद देणारी कविता प्रा. डॉ. शिवाजी दिवाण यांनी सादर केली तर मैत्रीची महती सांगणारी “साथियाँ” ही हिन्दी कविता प्रा. डॉ. संगीता आहेर यांनी सादर करीत या कविसंमेलनाला बहुभाषिकतेचा साज चढवला.

आता कविसंमेलन पूर्ण रंगले होते. त्यातच दिवंगत सिंधूताई सपकाळ यांच्या स्मृतींना उजाळा देत प्रा. हिरा खरात यांनी “अनाथांची माय” ही कविता सादर करून संमेलनाला कारुण्याची छटा दिली. “तू होतीस तेव्हा…” अशी आर्त साद प्रा. डॉ. तबस्सुम इनामदार यांनी मैत्रिणीला घातली.

“एकदा मला एक फोन आला…
तो कुणाचा होता हे कळलेच नाही…” असे म्हणत प्रा. बाबू वादे यांनी संमेलनाचे वातावरण पुन्हा हलके करीत दाद मिळवली.

प्रा. डॉ. कैलास सावंत यांनी “आई” च्या वात्सल्याची कविता सादर केल्यानंतर एकनाथ राठोड यांनी बंजारा भाषेचे सौंदर्य आपल्या कवितेतून सादर केले.
“उठो उठो जवान छोरो…” असे गायन करीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविचार बंजारा बोलीतून मांडला.

कविसंमेलन आता उतरार्धात पोहोचले होते. प्रा. डॉ. संदिपान किवने यांच्या कवितेनंतर “अरेंज मॅरेज” ही प्रा. डॉ. कल्पना घारगे यांची नर्मविनोदी कविता सादर झाली तर ग्रंथपाल डॉ. संजय भेदेकर यांनी “खिसा” द्वारे समाजवास्तवाचे चित्रण केले.

महाविद्यालयाच्या प्राध्यापक- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन करीत शिघ्रकवी प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनीही प्रसंगोचित आपल्या चारोळ्या सादर केल्या. मराठी विभाग प्रमुख प्रा. बापू घोक्षे यांनी आपली कविता सादर करीत सर्वांचे आभार व्यक्त केले.

या कविसंमेलनाचे मराठी विभागाच्या फेसबुकवरून प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांनी थेट प्रसारण केले तर संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागासह सुरेश कोकाटे, मिठू तळेकर, एकनाथ राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »