महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात बबन मोंढे यांचा सेवागौर
गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात सेवा निवृत्ती निमित्ताने बबन मोंढे यांचा सेवा गौरव करण्यात आला.
महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाटोदा येथील कला विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर बबन मोंढे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्या निमित्ताने महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाने त्यांच्या सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. कांचन परळीकर आणि महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बापू घोक्षे यांच्या हस्ते बबन मोंढे यांचा शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
बबन मोंढे यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून लौकिक प्राप्त केला असल्याची भावना या निमित्ताने मान्यवरांनी व्यक्त केली.
सदरील सेवागौरव कार्यक्रमास महिला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. मराठी विभागाचे प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश कोकाटे यांनी परिश्रम घेतले.