महावितरणचे कनिष्ठ अभियंता रवि शिंदे यांना आडसकरांकडून निरोप;तुमची कारकीर्द स्मरणात राहील
लोकगर्जनान्यूज
आडस : येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रवि शिंदे यांची ९ वर्षांनंतर येथून औरंगाबाद जिल्ह्यात बदली झाली. यामुळे आडसकरांच्या वतीने सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत निरोप दिला. या ९ वर्षांची शिंदे यांची कारकीर्द आडसकर कधीच विसरू शकणार नाहीत.
९ वर्षांपूर्वी एक तरुण औरंगाबाद जिल्ह्यातून थेट बीड जिल्ह्यातील आडस येथे कनिष्ठ अभियंता कार्यालय महावितरण कंपनी आडस येथे प्रमुख म्हणून दाखल झाला. पहिलीच पोस्टींग त्यात महावितरण कंपनी जिथे की, वसुलीसाठी शेतकरी ग्राहकांच्या दारावर जा वसुली नाहीतर कारवाईला तयार रहा म्हणारे वरिष्ठ अधिकारी अन् कंपनीचे धोरण पण वसुली नाही केली तर कारवाईचा बडगा उगारणारी कंपनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना साधी फ्यूज तारही पुरवीत नाही. की कोणते साधनं, ना शेतीसाठी योग्य दाबाने वीजपुरवठा पण याबाबत कधी त्या मोठ्या अधिकाऱ्यांनी विचारलं नसेल. आडस येथे तर अनेक अडचणी तेलगाव १३२ के.व्ही. वरून वीजपुरवठा त्यामुळे व्होल्टेज मिळत नाही. गाव मोठं अन् गावात सिंगल फेज रोहित्र. जिथे १५० चे रोहित्र लागते तिथे सिंगल फेजचे २५ के.व्ही. चे तीन रोहित्र ( याला डब्बे म्हणता येईल ) त्यामुळे सततच जळण्याची मालिका सुरू. लोक हलगी वाजवत कार्यालयावर अनेकदा आले. प्रमुख म्हणून रवि शिंदे काहीवेळा जेवणाच्या ताटावरुन उठून येत ग्राहकांचं ग्रहाणं एकूण घेत काहीतरी जुगाड करुन वीजपुरवठा सुरू करुन दिला. अनेक अडचणी असताना ग्राहकांचे समाधान करणे अन् वसुलीही करुन धारुर सब डिव्हीजन मध्ये हमखास प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे ते कधी आडसचे झाले हे ना रवि शिंदे यांना समजलं ना आडस येथील गावकऱ्यांना, तब्बल ९ वर्ष येथे अविरत सेवा करुनही यांची बदली का होतं नाही? हा कोणाच्या मनात प्रश्न निर्माण झाला नाही. याचे गमक हे त्यांच्या कामात होते. अन् काही चूका ही झाल्या असतील पण काम करणारा माणूसच चुकतो म्हणून गावानेही ते पदरात घेतल्या. दिर्घ काळ झाल्याने त्यांची अखेर जुलै मध्ये बदलीची ऑर्डर आली व ते कर्मभूमीतून जन्मभूमीत गेले. या निमित्ताने रविवारी ( दि. १६ ) रवि शिंदे यांना आडस वाहिन्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी युवा नेते ऋषिकेश आडसकर, कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकजण शिंदे साहेबांची कारकीर्द विसरुच शकत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करत होता. शिंदे साहेब आपणास लोकगर्जनान्यूजच्या वतीनेही पुढील कार्यासाठी शुभेच्छा.