महावितरणचा ( Mahavitaran ) भोंगळ कारभार: पंधरा दिवसांपासून गावातील रोहित्र मिळेना
पर्याय व्यवस्था केली पण योग्य दाबाने वीजपुरवठा नसल्याने व्यवसायिकांचे नुकसान
लोकगर्जनान्यूज
येथील सिंगल फेज योजना वीजपुरवठा करण्यात कुचकामी ठरत असून कमी क्षमतेचे रोहित्र असल्याने ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा रोहित्र जळाले की, १५-१५ दिवस मिळत नाही. यामुळे आडस ( ता. केज ) येथील विद्युत ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. परंतु महावितरण Mahavitaran कंपनीला याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. येथील वयराट डीपी मागील १५ दिवसांपासून बंद आहे. या डिपीवरील वीजपुरवठा शेतातील एका डीपी वरुन जोडण्यात आला. परंतु त्यामुळे फक्त दिवा लावायची गरज पडत नाही. इतर कोणतेही विद्युत उपकरण चालत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.
आडस हे गाव मोठे असून येथील बाजारपेठ ही मोठी आहे. तसेच येथे वीजबिल थकबाकीही नसते. तसेच वीज तुटही नाममात्र आहे. तरीही महावितरण Mahavitaran कंपनी येथे सेवा देण्यात कमी पडत आहे. यामध्ये सर्वात मोठी अडचण सिंगल फेज योजना असून कधीकाळी गावातील अंधार दुर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना अंधाराचे कारण ठरत आहे. वीज ग्राहक व मागणीच्या तुलनेत सिंगल फेज रोहित्रांची क्षमता कमी पडत असून यामुळे हे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कंपनीकडे सिंगल फेज रोहित्रांची संख्या कमी असल्याचे दिसत असून जळालेले रोहित्र लवकर मिळत नाही. आडस येथील वयराट डीपी वरील एक रोहित्र ( डब्बा ) २४ जूनला जळाला आहे. एक रोहित्र जळाल्याने कर्मचाऱ्यांनी बायपास करुन दोन फेजचा भार एकाच डब्ब्यावर टाकला. भार जास्त झाल्याने ३ जुलैला तोही दुसरा डब्बा जळाला आहे. ९ दिवसात दुसरा रोहित्र न मिळाल्याने दोन रोहित्र ( डब्बे ) जळाले. राहिलेल्या एकावर तीन फेजचा भार टाकण्यात येत नसल्याने तो वाचला. यानंतर ३ तारखे पासून या डीपीचा वीजपुरवठा शेतातील एका डीपीवर जोडण्यात आला. परंतु योग्य भार ( व्होल्टेज ) मिळत नसल्याने पंखे,फ्रिज, पिठाची गिरणी, वेल्डिंग मशीन, सुतार कामे करणाऱ्यांचे यंत्र हे काहीच चालत नाही. यामुळे छोट्या व्यवसायिकांचे नुकसान होत आहे. वीजबिल भरुनही वीज मिळत नसल्याचे चित्र आहे. हीच अवस्था मागील दोन ते तीन वर्षांपासून असूनही महावितरण कंपनी यावर काहीच तोडगा काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसुलीसाठी तत्पर असणारी महावितरण Mahavitaran कंपनी व त्याचे अधिकारी सेवा देण्यासाठी तत्पर कधी होणार? असा प्रश्न वीज ग्राहक विचारत आहेत.
आर्थिंगच व्यवस्थित नाही तर रोहित्र टिकणार कसे?
सिंगल फेज डीपीसाठी जमिनीची आर्थिंग खूप म्हत्वाची आहे. परंतु ज्यांच्या जागेत डीपी बसविला आहे. त्यांनी आर्थिंग करण्यास विरोध केला. यामुळे संबंधित गुत्तेदाराने रस्त्याच्या कडेला वीतभर खड्डा करुन त्यात आर्थिंगच पाईप गाडलं आहे. यामुळे ज्या प्रमाणात आर्थिंग पाहिजे ती नसल्याने सतत रोहित्र जळत असल्याची चर्चा आहे. परंतु याचे खापर ग्राहकांवर फोडून महावितरण कर्मचारी, अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा सदरील ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
रोहित्र नाही तर सिंगल फेज योजना सुरू का ठेवली?
सिंगल फेज रोहित्र जळाले की, ते पंधरा दिवस,एक महिना भेटत नाही. फोन केला की, उपलब्ध नाही. हे एकच उत्तर मिळतो. जर रोहित्रच नसतील तर ही सिंगल फेज योजना महावितरण कंपनीने सुरू का ठेवली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.