महावितरणचा गलथान कारभार कधी थांबणार?
चार महिन्यांनंतर हनुमान मंदिर डीपीचे ट्रान्सफॉर्मर मिळाले आता वयराट डीपीचे कधी मिळतील?

लोकगर्जनान्यूज
आडस : येथे सिंगल फेज रोहित्र असून ते नेहमीच जळत आहेत. ते एकदा जळाले की, चार-चार महिने मिळत नाहीत. आता वयराट डीपीवरील दोन सिंगल फेज रोहित्र जळाले आहेत. ते कधी मिळणार की, या डीपीवरील ग्राहक अंधारातच रहाणार? हा प्रश्न आडसकरांना पडला असून, दोन वर्षांपासून फक्त डीपीवर लोड आहे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा लोड कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले? हे वीज ग्राहकांना द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. सततच वीजपुरवठा बंद रहात असल्याने हा गलथान कारभार नेमका थांबणार कधी? असा प्रश्न वीज ग्राहक विचारत आहेत.
केज तालुक्यातील आडस येथे माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील १३२ के.व्ही. केंद्रावरुन वीजपुरवठा करण्यात येतो. थोडीशी हवा अथवा पाऊस आला की, या १३२ विद्युत वाहिनीचा बिघाड होतो. यामुळे सततच वीजपुरवठा खंडित होतो. हा बिघाड नाही झाला तर येथील सिंगल फेज रोहित्र जळतात. हे रोहित्र एकदा जळाले की, चार-चार महिने मिळत नाहीत. हनुमान मंदिर, रेस्ट हाऊस, नेटके, डुमने या डीपीवरील रोहित्र जळाल्यानंतर ४ महिन्यांनंतर मिळाले. यातील डुमने डिपीचे रोहित्र मिळाले नाही. तोपर्यंत गावातील वयराट डीपीचा एक रोहित्र शनिवारी जळाला असून तीन्ही फेज चालु ठेवण्यासाठी दुसराही जळाला आहे. सध्या या भागात अंधार आहे. हे दोन रोहित्र लवकर नाही बसले तर तिसराही रोहित्र जळू शकतो. रोहित्र काही अद्याप मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील वीज ग्राहकांना नेमकं किती दिवस अंधारात बसावं लागणार? हे महावितरणचे अधिकारी अन् कर्मचारी जानो. परंतु नेहमीच रोहित्र जळत असतानाही यावर महावितरण कंपनी कोणताच तोडगा काढत नसल्याने नेमके महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी आहेत की, बंद ठेवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन वर्षांपासून हीच अवस्था
गावातील वयराट, दवाखाना आणि हनुमान मंदिर या तीन डिपीचे रोहित्र सतत जळण्याची मालिका सुरू आहे. या तीन डीपीवर खूप लोड आहे असे आडस येथील महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी म्हणतात. या डीपीवरील लोड कमी करण्यासाठी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काय प्रयत्न केले? हा संशोधनाचा विषय आहे. जर काहीच प्रयत्न झाले नसतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सिंगल फेज योजना करते अंधाराचे कारण!
राज्यात १२ तास भारनियमन सुरू होते तेव्हा गावातील अंधार दूर करण्यासाठी मोठा गाजावाजा करुन ग्रामीण भागात सिंगल फेज योजना सुरू केली. परंतु आडस येथील चित्र पहाता सिंगल फेज योजना अंधाराचे कारण ठरत आहे. यामुळे येथे गावठाण फिडर वेगळे करून थ्री फेज रोहित्र बसविण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.