आपला जिल्हा

महावितरणचा अजब कारनामा: रात्री शेती पंपाला वीजपुरवठा सुरू केल्यानं दिवसा गाव अंधारात

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून आडसची ओळख. परंतु मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या कारभाराने अंधारात बुडालेले गाव अशी नवी ओळख मिळाली आहे. दोन दिवसांपासून तर अजब नियम लादण्यात आले. रात्री १२ ते सकाळी ८ असा शेती पंपासाठी वीजपुरवठा सुरू झाला. यामुळे सकाळी ८ ते दुपारी ४ असा तब्बल ८ तास दिवसा गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे रात्री उजेड मात्र दिवसा अंधार अशी अवस्था झाली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आडसला कोणी वाली आहे की, नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

आडस येथे ३३/११ के.व्ही केंद्र आहे. यास तेलगाव येथील १३२ के.व्ही. केंद्रावरुन वीजपुरवठा करण्यात येतो. तेलगाव ते आडस हे ४७ कि.मी. चे अंतर आहे. तेलगाव आणि आडस दरम्यान एकूण सहा ३३/११ के.व्ही. केंद्र आहेत. सर्वांच्या शेवटी आडस केंद्र असल्याने येथे योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. सध्या शेती पंप सुरू असल्याने वीज मागणी वाढली असून, यामुळे तर वीजपुरवठ्याचा दाब इतका कमी झालं आहे की, पंखाही फिरत नाही. तसेच शेती पंप चालावेत म्हणून येथे आडस, खोडस, आसरडोह असे तीन फिडर केले आहेत. याद्वारे वेळ बदलून ८-८ तास शेतीसाठी थ्री फेज सोडले जाते. परंतु रात्री ज्या फिडरचा नंबर त्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा मिळतो पिकांना पाणी मिळते. मागील तीन आठवड्यापासून आडस फिडर सकाळी ८ ते दुपारी ४ असे होतं. यामुळे या फिडरच्या शेतकऱ्यांचे पंप चालत नसल्याने त्यांनी रात्री १२ ते सकाळी ८ अशी वीज देण्याची मागणी केली. ती मान्य करत महावितरण कंपनीने वेळ बदलून रात्री वीजपुरवठा सुरू केला. परंतु यामुळे सकाळी ८ ते ४ दिवसा फिडर बंद रहात असल्याने गाव अंधारात बुडाले आहे. यासाठी लोड येतो हे कारण सांगितले जात आहे.दोन महिने झाले येथे असेच महावितरण कंपनीचे अजब नियम राबविण्यात येत आहे. परंतु ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनाही काही देणेघेणे नाही. गावातील नेतेही यावर काही बोलण्यास तयार नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
लोड वाढला वीजपुरवठा बंद करा
आडस येथे लोड ( भार ) वाढला की, वीजपुरवठा बंद करणं एवढेच काम करत असून, गावातील सिंगल फेजचे रोहित्र जळत असल्याने पहाटे ५ ते ८ भारनियमन सुरू आहे. यानंतर दोन दिवसांपासून गाव अंधारात आहे. परंतु हा येणारा लोड कमी करण्यासाठी अथवा त्याची विभागणी करण्यासाठी महावितरण कंपनीने काय प्रयत्न केले. हा संशोधनाचा विषय आहे. फक्त लोड वाढला की, वीजपुरवठा बंद करणे हा एक कलमी कार्यक्रम आडस येथे महावितरण कंपनीने सुरू केला आहे.
*शेतकऱ्यांनो जागे व्हा अन्यथा…?
शेतकऱ्यांनो जागे व्हा आतापासूनच वीजपुरवठा सुरळीत कसा मिळेल यासाठी काही उपाययोजना करा. यावर्षी गाव अंधारात अन् शेतीला वीज असे चित्र आहे. पुढच्या वर्षी शेती अन् गाव दोन्ही अंधारात बुडालेले असतील. अन् तुमच्या मदतीसाठी कोणीही पुढे येणार नाही? कारण तुम्ही कपडे चांगले घातले तर काहींना पहावत नाही तर तुमची प्रगती कशी पचेल. यामुळे आताच जागे व्हा आणि पुढच्या वर्षी तरी सुरळीत वीजपुरवठा मिळावं म्हणून कामाला लागा.
मुख्य रोहित्र जळण्याची भीती
येणारा वीजेचा दाब कमी आहे. आडस व खोडस फिडर सोबत चालु ठेवलं तर काहीच चालणार नाही. यामुळे ३३/११ के.व्ही.चा मुख्य रोहित्र जळण्याची शक्यता आहे. यामुळे गावातील वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो आहे. पुढील आठवडाभर नागरिकांनी सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया महावितरण कनिष्ठ अभियंता रवी शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »