महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे विविध मागण्यासाठी जिल्हा पातळी पासून मुंबई पर्यंत होणार आंदोलन!
लोकगर्जना न्यूज
( दि. २० ) फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची ऑनलाईन बैठकीत पार पडली. यामध्ये
अंगणवाडी कर्मचारी मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ॲप, अंगणवाड्यांसाठी भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ इत्यादी मागण्यांसाठी आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात बुधवार ( दि. २३ ) पासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
कृती समितीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात २३,२४,२५ फेब्रुवारी तीन दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन होईल यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज २०० या संख्येने सहभागी होतील.तसेच कृती समितीचे सर्व प्रमुख नेते सहभागी होतील. दुसऱ्या टप्प्यात २८ फेब्रुवारी ते ७ मार्च – प्रकल्प, जिल्हा पातळीवर तीव्र निषेध निदर्शने करण्यात येणार आहेत. आझाद मैदानावरील धरणे आंदोलना वेळी शिष्टमंडळाला निमंत्रित करून सकारात्मक चर्चा न झाल्यास प्रकल्प, जिल्हा परिषद, विभागीय उपायुक्त कार्यालये आदी ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येतील, यामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर ९ मार्च २०२२ – आझाद मैदान, मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो अंगणवाडी कर्मचारी सामील होतील. २८ ते २९ मार्च दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संयुक्त संप पुकारला जाणार आहे. नुकताच जाहीर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई शिगेला पोहोचली आहे. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण केले जात आहे. बडे व्यावसायिक सर्वसामान्य माणसाचे बँकेत ठेवलेले कोट्यवधी रुपये बुडवून पळून जात आहेत. शिवाय शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात कायदे केले जात आहेत. त्यांच्या विरोधातील धोरणे राबवली जात आहेत. याविरोधात हा संप होणार असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक दिवस जिल्हा, तालुका पातळीवरील संयुक्त आंदोलनात सहभागी व्हावे व एक दिवस स्थानिक पातळीवर आंदोलन करावे. असे आवाहन एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांनी केले आहे.