महाराष्ट्राची मदर तेरेसा काळाच्या पडद्याआड
अनाथांची माय म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी आज पुण्यात अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र मायेला पोरका झाला असून महाराष्ट्राची मदर तेरेसा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अनाथांसाठी आपले जीवन वाहणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा. पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला