महाराणा ते छ. शिवाजी महाराज चौक रस्त्याची दुरवस्था; दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला
लोकगर्जना न्यूज
आडस: केज तालुक्यातील आडस येथील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येत नाही. यामुळे अनेक दुचाकीस्वार पडल्याने दुखापत झाली आहे.
केज तालुक्यातील सर्वात मोठे व बाजारपेठेचा गाव म्हणून आडसकडे पाहिले जाते. परंतु रस्त्यांच्या बाबतीत आडस नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. यामुळे गावाच्या विकासातही खड्डे युक्त रस्ते मोठी आडकाठी ठरत आहेत. आडस ते होळ , आडस ते आसरडोह, आडस ते उंदरी, पिसेगाव, आडस ते धारुर, आडस ते सोनवळा हा एकही रस्ता धड नाही. केवळ आडस ते अंबाजोगाई रस्ता चांगला आहे. परंतु केंद्रेवाडी येथील आश्रम शाळेपर्यंतचे काम व्यवस्थित न झाल्याने या दरम्यान खड्डे पडले आहेत. येथे येण्यासाठी रस्ताच नसल्याने लोकांनी पाठ फिरवल्याने बाजार पेठ ओस पडली आहे. यामुळे अनेकांचं नुकसान होत आहे. आता गावातून जाणाऱ्या राज्यमार्गाचीही लक्तरे झाली आहेत. सध्या महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान अक्षरशः चाळण झाली आहे. गुडघ्याबरोबर बरोबर खड्डे पडले आहेत. मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हे खड्डे पाण्याने भरले असल्याने दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे या पाच दिवसात अनेक दुचाकीस्वार पडले असून दुखापत झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच अवस्था असल्याने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.