महसूल पथकाच्या वाहनाचा अपघात; मंडळअधिकारी ठार, तहसीलदार जखमी
बीड : गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी बीड येथील पथक कारवाईसाठी गेले होते. या पथकाच्या वाहन रस्त्याखाली उतरुन झाडावर धडकल्याने राक्षसभुवन जवळ पहाटे अपघात झाला. यामध्ये महसूल मंडळअधिकारी ठार झाले तर बीडचे तहसीलदार व अन्य एक असे दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बीड येथील महसूलचे पथक शनिवारी रात्री ( दि. ५ ) गेवराई तालुक्यातील सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव, राक्षसभुवन भागात गस्तीवर होते. या दरम्यान पहाटे पथकाची ब्रेझा गाडी क्रमांक एम.एच. २३ ए डी ४४३५ वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ब्रेझा कार रस्त्याच्या कडेला झाडावर जोरात आदळून झालेल्या भीषण अपघातात मंडळअधिकारी नितीन जाधव हे जागीच ठार झाले आहेत. बीडचे तहसीलदार प्रभारी सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सोनू ( पुर्ण नाव समजु शकले नाही ) हे जखमी आहेत. तहसीलदार डोके यांना उपचारासाठी पुणे येथे रेफर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनमिळाऊ स्वभावाचे नितीन जाधव यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.