मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा सुरू राहणार-मनोज जरांगे
लोकगर्जनान्यूज
केज : मराठा आरक्षणाच्या मागणीच्या लढ्यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या संवाद दोऱ्याची बैठक गुरूवार (दि.१४) रोजी शहरातील मुक्ताई लाॅन्स येथे पार पडली. या बैठकीला तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढा जोपर्यंत सगे-सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाशी मनोज जरांगे संवाद साधत आहेत. या संवाद दौऱ्यासाठी गुरूवारी सकाळी तालुक्यातील आनंदगाव (सारणी) येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून केज शहराच्या दिशेने रवाना झाले. दुपारी केज शहरात संवाद यात्रा दाखल होताच जोरदार स्वागत करण्यात आले. शहरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षाचे मनोज जरांगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुक्ताई लाॅन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठक स्थळी आगमन होताच मनोज जरांगे यांचे मराठा भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या मराठा बांधवांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. व्यासपीठावर दाखल होताच मराठा समाज, मुस्लिम समाज व फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांच्या संघटनांनी स्वागत केले. जिजाऊ वंदनाने बैठकीची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, मागील सात महिन्यांपासून आरक्षणाचा लढा सुरू आहे. शासनाला वेळोवेळी मुदतवाढ देऊन सहकार्य करूनही शासनाने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे सोडून पन्नास टक्याच्या वर जाऊन सर्वोच्च न्यायालयात न टिकणारे दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. मात्र राज्य शासनाने मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत न पाहता सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी मरण पत्कारेन या आरक्षणाच्या लढ्यापासून एक इंचभरही मागे हटणार नसल्याचा विश्वास दिला. सत्ताधाऱ्यांनी माझा घातपात घडवून आणण्याचा कट रचला. कांही आपल्याच लोकांना हाताशी धरून बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. येवढ्यावरच न थांबता एसआयटी चौकशी लावली. अटक करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतू मी अशा चौकशीला भीक घालत नाही. याद राखा मराठा समाजाचा विकासघात करण्याचा प्रयत्न कराल तर हा बहुसंख्येने असलेला मराठा समाज तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. आपली एकजूट कायम ठेवा, हे सरकार आपली आरक्षणाची मागणी पूर्ण कशी करीत नाही ते मी पाहतो असे सांगितले. या बैठकीला तालुक्यातील मराठा समाज एकवटला होता. तर यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.राष्ट्र गीताने संवाद बैठकीचा समारोप करण्यात आला.
मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्याचे क्षणचित्रे–
•मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्याचे तालुक्यात आगमन होताच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्यात आले.
•केज शहरात सुरू करण्यात आलेल्या
कुणबी प्रमाणपत्र मदत कक्षाचे उद्घाटन.
•बैठकीला उपस्थित मराठा समाजाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.