मयत शेतकऱ्याच्या बँक खात्यावरील १ लाख गायब प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी दिले चौकशीचे आदेश

लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील दि बीड जिल्हा म.सहकारी बँकेच्या शाखेतून कानडीघाट येथील मयत शेतकऱ्याच्या खात्यातून परस्पर १ लाख रुपये गायब झाले. हा प्रकार लक्षात येताच मयताचा मुलगा व सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी तक्रार केली. याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती डॉ.गणेश ढवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे रा. कानडीघाट ( ता. बीड ) यांचे २३ मे २०१९ रोजी निधन झाले. त्यांचे जिल्हा बँकेच्या चौसाळा शाखेत खाते खाते आहे. या खात्यातून परस्पर रक्कम दि.२८ ऑगस्ट २०१९ रोजी ४७ ,७००,दि.२२ ऑगस्ट २०१९ रोजी १३,६०० दि.२३ डिसेंबर २०१९ रोजी १६,००० दि.२ मार्च २०२० रोजी २३,२०० रूपये असे एकुण १ लाख ५०० रूपये काढण्यात आले. हा प्रकार मयत शेतकऱ्याच्या मुलाच्या लक्षात आले. यानंतर संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी तक्रार डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ( महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती ) आणि विजय झोडगे यांनी ( दि.१३ ) जानेवारीला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड, पोलीस अधीक्षक बीड, अध्यक्ष व व्यावस्थापक मुख्य शाखा जिल्हा मध्यवर्ती बँक बीड यांना केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक यांनी ( SIT ) पथका मार्फत चौकशी करून अहवाल कार्यालयात सादर करावा असे आदेश दिले.
चौसाळा शाखेत चाललंय काय?
येथील शाखेतील गोलांग्री येथील प्रकरणी तीन कर्मचारी निलंबित झाले आहेत. त्यात हा प्रकार यामुळे आम्हाला येथे आधिकारी-कर्मचारी व दलालांच्या संगनमतानेच शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलून आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर