मदत मागितली तर पोलीस मलाच धमकावतात! चिठ्ठी लिहून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : शहरातील एका तरुणाने शेतीच्या वादातून व मदत मागितली तर पोलीस मलाच धमकावतात असा आरोप करत पोलीस अधीक्षक यांच्यासह चिठ्ठी लिहून विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणावर प्रथम माजलगाव आता बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पठाण रिजवान रहिमखां रा. फुले नगर ( माजलगाव ) या तरुणाने विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती अत्यवस्थ असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पुर्वी रिजवान याने पोलीस अधीक्षक यांच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती सध्या खूप व्हायरल होत आहे. या चिठ्ठीत तरुणाने माझ्या वडिलांना वक्फ बोर्ड कडून तालुक्यातील खरात आडगाव येथे गट नंबर १६५ मधील शेती भाडे तत्वावर मिळाली आहे. परंतु ही शेती काहीजण लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोक परस्पर पीक काढून घेऊन जात असल्याने मी पोलीसांना फोन करून मदत मागितली. परंतु त्यांनी घटनास्थळी येऊन मलाच धमकावले. यामुळे व्यतीत झालेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलून शनिवारी ( दि. २२ ) विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच तातडीने माजलगाव येथे दवाखान्यात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने रात्री बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या येथे उपचार सुरू आहे. विषारी द्रव्ये प्राशन करण्यापूर्वी रिजवान पठाण याने पोलीस अधीक्षक,बीड यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये काही नाव लिहून यांना जबाबदार धरावे असे म्हटले आहे,तर पोलीस मलाच धमकावतात असा आरोप केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.