क्राईम

भीषण दुर्घटना! अपघातानंतर ७ वाहनं व टॅंकर चालकाचा कोळसा: मोठं आर्थिक नुकसान

लोकगर्जनान्यूज

लातूर : ऊसाचे ट्रॅक्टर आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरची धडक होऊन घडलेल्या अपघातानंतर लागलेल्या आगीत ७ वाहनं जळून खाक झाली. टँकर चालक केबिनमध्ये अडकल्याने कोळसा झाल्याची भीषण दुर्घटना लातूर-अहमदपूर रस्त्यावर भातांगळी पाटीवर बुधवारी रात्री उशिरा घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी लातूर, अहमदपूर, उदगीर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान व एकजण ठार तर चौघे जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, लातूर-अहमदपूर रस्त्यावर भातांगळी पाटी जवळ उडान पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजूने तात्पुरता रस्ता काढण्यात आला. बुधवारी ( दि. २३ ) रात्री १० च्या सुमारास डिझेल टँकर क्र. एम. एच. २४ ए व्ही ८९५१ हे कच्च्या रस्त्याने जाताना समोरुन ऊस वाहतूक करणारे डबल ट्रॅलीचे दोन ट्रॅक्टर आले. यातील एक ट्रॅक्टर व डिझेल टँकरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टँकरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले. यामुळे टँकर चालक शेख गफार इस्माईल ( वय ४५ वर्ष ) रा. वायगाव ( ता. अहमदपूर ) यांचे दोन्ही पाय अडकल्याने बाहेर निघता आले नाही. रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांची रांग लागली. अपघात ग्रस्त टँकर मधून डिझेल गळती होऊन त्याचा पाट इतर वाहनांच्या खाली गेला. अचानक आग लागली. यामध्ये सदरील टँकर, दोन ट्रॅक्टर क्र. एम.एच. २४ बी एल ४१७५, एम. एच. २४ ए एस ८६७९, कापूस भरलेला ट्रक क्र. टी. एल. ५२ डी ३४९८, नांदेड – लातूर एसटी क्र. एम. एच. २० बी एल ३७९०, कार एम. एच. २४ बी एल ०५६९ आणि एक इंडिका नंबर समजले नाही. असे सात वाहने जळून खाक झाली. यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाले. टँकरला आग लागल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी टँकर चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही पाय अडकल्याने प्रयत्न फसला आणि आगीने रौद्ररूप धारण केल्याने व टँकर मध्ये इंधन असल्याने टँकर चालक शेख गफार इस्माईल यांचा सर्वांच्या डोळ्यांदेखत कोळसा झाला. ही ह्रदयद्रावक घटना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. घटनेची माहिती पोलीसांना होताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच लातूर, अहमदपूर, उदगीर येथील अग्निशमन दलाचे वाहनं बोलावून आग आटोक्यात आणली. यावेळी वाहन जळत असताना अचानक पळापळ सुरू झाली. यामध्ये शेख अझहर बबनसाब, वैभव धोंडगे, ओमप्रकाश पन्नालाल बजाज, सौ. शारदा ओमप्रकाश बजाज हे चौघे जखमी झाले. हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस येताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »