भीषण अपघातात तीन तरुण ठार; घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

बीड : बीड ते मांजरसुंबा दरम्यान पाली जवळ बस व बुलेटची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बुलेट वरील तिघांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच तिन्ही तरुणांच्या नातेवाईकांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड येथून मांजसुंबाच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम. एच. १४ बी टी २४५५ आणि आहेर वडगाव येथून येथून बीडच्या दिशेने येत असलेली बुलेट क्रमांक एम.एच. २३ एल ७२२७ या दोन्ही वाहनांची पाली जवळील हॉटेल नक्षत्र समोर जोराची धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, बुलेट वरील कृष्णा भारत शेळके ( वय २३ वर्ष ) रा. द.शहाजानपूर आणि पारसनाथ मनोहर रोहीटे ( वय २२ वर्ष ) रा. आहेर वडगाव हे दोघे जागीच ठार झाले तर अक्षय सुरेश मुळे ( वय २२ वर्ष ) रा. घोडका राजुरी हा गंभीर जखमी होता. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करुन उपचारासाठी तातडीने बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु अक्षयचा ही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही मित्र असून वयक्तिक कामासाठी आहेर वडगाव येथे गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास बुलेट वर टीबलसीट येताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच तिन्ही तरुणांच्या नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी बीड जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यामुळे येथे मोठी गर्दी झाली होती. अवघे २३ व २२ वर्षांचे तरूण अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर नातेवाईकांच्या हुंदक्यांनी परिसर सुन्न झाले आहे. वाढत्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.